बीड : जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमानिमित्ताने पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून, या कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत विमानाने नांदेडला येतील. त्यानंतर, नांदेडहून पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर पोहोचतील. गोपीनाथ गडावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर परळी शहरातील विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाला निघतील. त्यामुळे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षभरात यापूर्वी दोन वेळा देवेंद्र फडणवीस हे बीडला आले. मात्र दोन्हीवेळी पंकजा मुंडे अथवा भाजप खासदार प्रीतम मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर गेल्या नव्हत्या. मात्र, आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि अजित पवार येत असताना पंकजा मुंडे सुद्धा या कार्यक्रमात पाहायला मिळतील.
सुमारे दीड हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री धनंजय मुंडे आज बीडच्या परळीत पोहचणार आहे. परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सर्व नेतेमंडळी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी, सुमारे दीड हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ होणार असून, अनेक पूर्ण कामांचे होणार लोकार्पण देखील होणार आहे. सोबतच, विविध शासकीय योजनांच्या जिल्ह्यातील सुमारे 22 हजार लाभार्थींना होणार थेट लाभाचे वितरण करण्यात येणार आहे.
'या' कामांचा होणार शुभारंभ
परळी तालुक्यातील सिरसाळा एमआयडीसी उभारणीचे भूमिपूजन, परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या 286 कोटी 68 लाख रुपयांच्या आराखड्याचे भूमिपूजन, परळी तालुक्यात कृषी विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या सोयाबीन संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय या तीन शासकीय संस्था उभारणीच्या 311 कोटींच्या कामांचे भूमिपूजन, बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या 61 कोटी रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन, परळी शहर बसस्थानकाच्या सुधारित कामाचे भूमिपूजन, बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन, यांसह बीड जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सिरसाळ्यात उभारण्यात आलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे व्यापारी संकुलाचे लोकार्पण आणि जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सुमारे 22 हजार लाभार्थींना विविध योजनेतील लाभाचे थेट वाटप या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Pritam Munde : सध्याचे राजकारण म्हणजे कबड्डीचा खेळ झाला आहे; प्रीतम मुंडे स्पष्टच बोलल्या