Dasara Melava 2024 Pankaja Munde Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) तब्बल 12 वर्षांनंतर आज भगवान गडावरील दसरा मेळावानिमित्त (Pankaja Munde Dasara Melava 2024) एकत्र आले आहेत. धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर मुंडे घराण्यात फुट पडली होती. त्यानंतर 2014 साली गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. त्यानंतर आतापर्यंत पंकजा मुंडे यांच्या उपस्थित हा दसरा मेळवा पार पडत होता. 2023 मध्ये अजित पवार यांनी 2023 मध्ये महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा अनेकदा एकत्रित पाहायला मिळाले. मात्र आज धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच भगवान गडावर उपस्थिती लावली आहे.
धनंजय मुंडेंनी घेतले नामदेव शास्त्री यांचे आशीर्वाद-
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) भगवान गडावर दाखल झाले आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांनी भगवान गडावरील श्री संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या दर्शनानंतर धनंजय मुंडे यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची देखील भेट घेतली. यावेळी नामदेव शास्त्री यांच्या पायावर डोकं ठेवत धनजंय मुंडे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.
बॅनरवर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो नाही-
भगवान गडावर आज माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असून या दसरा मेळाव्यानिमित्त लावलेल्या बॅनरवर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. याबद्दल धनंजय मुंडे यांना विचारले असता माझ्यासारखा भगवान बाबांचा एक भक्त कुठला फोटो, कुठे असावा यासाठी नाही. तर बाबांची भक्ती आपण व्यक्त करावी, यासाठी इथे जात नाही. त्यामुळे फोटो असावेत नसावेत हे महत्त्वाचं नाही, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
भगवान भक्ती गडावर मी गेल्या दहा वर्षापासून दसरा मेळावा करत आहे. सात वर्षांच्यावर सावरगाव येथे हा मेळावा होत आहे. त्याठिकाणी आम्ही भगवान बाबांची मूर्ती निर्माण केली आहे. दरवर्षी आम्ही तिथे जातो सोनं लुटतो आणि सिमोलंघन करतो. धनंजय मुंडे आणि मी आम्ही एकत्र कधीच दसरा मेळावा केला नाही. दसरा मेळावा हा मुंडे साहेबांचा असायचा, आणि आम्ही समोर मांडी घालून बसलेला असायचो, आम्ही काय भाषण करायचो नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच आता आम्हाला (मला आणि धनंजय मुंडेंना) एकाच मंचावर येण्याची सवय झाली आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली.
धनंजय मुंडे आणि भगवान गड-
2009 साली गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेंऐवजी पंकजांना तिकीट दिलं आणि इकडूनच नाराजीला सुरुवात झाली. 2012 साली धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या बंडानंतर लोकांच्या रोषामुळे धनंजय मुंडेंना भगवान गडावरून परत जावं लागलं. त्यानंतर धनंजय मुंडे भगवान गडावर दसरा मेळाव्याला कधीही गेले नाहीत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर दहा वर्षांपासून पंकजा मुंडे दरवर्षी भगवान गडावर दसरा मेळावा आयोजित करतात. मात्र या 12 वर्षांत धनंजय मुंडे कधीही भगवान गडावर मेळाव्याला गेले नव्हते. आता मात्र, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे महायुतीच्या एकाच छताखाली आहेत. त्यांच्यातला दुरावाही आता उरलेला नाहीय, असं दिसून येत आहे.
संबंधित बातमी:
Pankaja Munde : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...