Beed News : बीड : राज्यातील मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न अजून कायम आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याचा निर्णय घेतला असून येत्या 17 सप्टेंबरपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. अशातच, बीडमध्ये (Beed News) गुरुवारी घडलेल्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे. बीडमध्ये तीन अज्ञातांनी मराठा आरक्षणासाठी घोषणा देत एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न केला. चालक आणि मेकॅनिकने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत एसटी बसचं (ST Bus) नुकसान झालं असून बसमधील चार सीट्स जळून खाक झाल्या आहेत.
बीडच्या घोडका राजुरीजवळ एका एसटी बससमोर अचानक तीन अज्ञात लोकांनी कार आडवी लावली. त्यानंतर एसटी बसमधून चालक आणि मेकॅनिकला खाली उतरवलं, त्यानंतर त्या तिघांनी एसटी बसमध्ये पेट्रोल ओतलं आणि बसमधील सीट पेटवले. संबंधितांनी या वेळी 'एक मराठा, लाख मराठा' अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, चालक आणि मेकॅनिकनं प्रसंगावधान राखून आग विझवली. तोपर्यंत बसमधील 4 सीट जळून खाक झाल्या होत्या.
नेमकं काय घडलं?
बीड तालुक्यातील हिवरापहाडी येथे मुक्कामी असलेल्या बसमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे बीड आगारातील मेकॅनिक उत्तम राऊत आणि राम कुलथे हे हिवरापहाडी येथे आगाराची बस घेऊन दुरुस्तीसाठी निघाले होते. बीड परळी रोडवर घोडका राजुरी येथील तलावाजवळ बस आल्यानंतर, मागून एक विनाक्रमांकाची कार त्यांच्या बससमोर येऊन थांबली याच वेळी कारमधून उतरलेल्या तीन तरुणांनी बसमध्ये प्रवासी आहेत का, याची विचारणा केली. बस दुरुस्तीसाठी जात असल्याचं राऊत यांनी या तरुणांना सांगितलं. त्यांनी राऊत, कुलथे यांना बसच्या खाली उतरवून आमचा आरक्षणाचा प्रश्न आहे, तुम्ही मध्ये पडू नका असं म्हणून 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणाबाजी केली. आणि एसटी बसमध्ये घुसून पेट्रोल शिंपडू लागले.
तसेच, कारमधून पेट्रोलची बाटली काढून एक तरुण बसमध्ये चढला. त्यानं सीटवर पेट्रोल ओतलं, दुसऱ्यानं बाहेरून बसमध्ये काडी पेटवून टाकल्यानं सीट पेटलं. राऊत, कुलथे यांनी जवळच रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणावरून टाकीतून पाणी आणून ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत चार ते पाच सीट जळून 10 हजारांचं नुकसान झालं. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.