बीड : राज्यात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणावरुन वातावरण तापलं असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्याही फैरी झडताना दिसत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या अटकेसाठी बीड जिल्ह्यात आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला असून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या घटनेचा मुख्य सुत्रधार अटक करावा, अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेद्र आव्हाड यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमदार, खासदार सहभागी झाले आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असून महिला वर्गाचेही प्रमाण लक्षवेधी आहे. या मोर्चापूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड (JItendra Awhad) यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी, थेट मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केलीय. तसेच, वाल्मिक कराडवरही गंभीर आरोप केले आहेत. यांच्यासारख्यामुळे आमची जात बदनाम होतेय, असे म्हणत वाल्मिक कराडने 20 खून केल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय. 


बीडमधील घटनेच्या तपासासंदर्भात बोलताना, सीआयडी तपास करु देत किंवा आणखी कोणी, पोलीस काही वरतून येत नाहीत. शेवटी वरती असतं ते सरकार, सरकार जसा आदेश देतं तसं पोलीस यंत्रणा काम करते हे गेल्या काही वर्षात सिद्ध झालंय. याचा मुख्य सुत्रधार धनंजय मुंडे आहे, मी विधानसभेत आणि बाहेरही तेच सांगितलंय. धनंजय मुंडेंनी खून केलाय असं मी म्हणत नाही. पण, वाल्किक कराडचा बाप तो आहे, तो स्वत: खून झाल्यानंतरही सांगतोय की, वाल्मिक कराड माझ्या जवळचा आहे. येथील विष्णू चाटे, घुले, हे कुणाची माणसं आहेत. यांच्याकडे इम्पोर्टेड गाड्या, जमिनी, रिव्हॉल्वर हे सगळं कुठून आलं, असा सवाल उपस्थित करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट धनंजय मुंडेंनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलाय. 


वाल्मिक कराड रक्तपिपासू, 20 खून केले


बीडमध्ये अर्ध्याहून अधिक खून वंजाऱ्यांचेच झालेत आणि तेही यांनीच केले आहेत. वाल्मिक कराड हा नरभक्षक वाघ कसा असतो, तसा नरभक्षक वाल्मिकी आहे. खरं तर वाल्मिकी कोणीही म्हणू नका, तो वाल्या आहे, या वाल्याला कधी पकडणार हे पोलिसांनी सांगायला हवं, वाल्मिक कराड हा आधुनिक वाल्या रक्तपिपासू आहे, आत्तापर्यंत 20 वंजारा समाजाचे खून त्याने केले आहेत. आमची जात यांच्यामुळे बदनाम होते आहे, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा, अशी पहिली मागणी मी केली होती, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 



फडणवीसांनी बीडमधील परिस्थिती हाताळा


मंत्रिपदाचा मंत्र्यांच्या बंगल्याचं वाटप थांबवा आणि पहिला बीडला येऊन इथली परिस्थिती हाताळा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी केलीय. संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या आहे, अठरापगड जातीचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत, असेही सलगर यांनी म्हटलं. 


हेही वाचा


बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार