बीड : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांकडून विरोध करण्यात आला आहे. सोबतच, अंबड येथील ओबीसी सभेनंतर (OBC Sabha) आता राज्यभरात सभा घेण्यासाठी मेळावे घेतले जात आहे. दरम्यान, बीडमध्ये (Beed) देखील ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (OBC leader Prakash Shendge) यांच्या उपस्थित ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी, मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) विरोध करण्यात आला, तसेच मराठा उमेदवारांना निवडणुकीत मतदान न करण्याची शपथ घेण्यात आली. तर, सरकारने सरसकटचा निर्णय घेतल्यास, 2024 ला या सरकारला खाली खेचू असा इशारा देखील प्रकाश शेंडगे यांनी दिला.


दरम्यान यावेळी बोलतांना शेंडगे म्हणाले की, "बीडमधील हिंसाचाराचा मास्टर माईंड पोलिसांना सापडत नसेल तर, आरोपींना आमच्या हवाली करावे. आम्ही स्वतः या लोकांना शोधून दाखवतो, असे शेंडगे म्हणाले. तर, बीडच्या ओबीसी मेळाव्यात मराठा समाजातील एकाही उमेदवाराला मतदान न करण्याची शपथ घेतल्याचं देखील प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. तसेच, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा कायम विरोध आहे. जर, सरकारने तसा जीआर काढल्यास आम्ही न्यायालयात जाणार आहोत. सोबतच, 2024 ला सरकारला खाली खेचू, असा इशारा देखील प्रकाश शेंडगे यांनी दिला. तसेच, अंबड पेक्षा मोठा मेळावा हिंगोली येथे होणार असल्याचा दावा,” शेंडगेंनी केला आहे. 


अंबडनंतर आता हिंगोलीतही ओबीसी सभा... 


मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्यासाठी ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. हा विरोध दाखवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जालना येथील अंबडमध्ये ओबीसी सभा पार पडली. आता हिंगोली जिल्ह्यात देखील ओबीसी सभेचं आयोजन करण्यात आले आहे. 26 नोव्हेंबरला म्हणजेच संविधान दिनी हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसीची विराट सभा होणार असल्याची माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे.  या सभेला देखील ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामधून लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव या सभेला येणार असून, पारंपारिक वेशभूषा आणि पारंपारिक नृत्य करत ओबीसी समाजातील सर्व समाजबांधव येथील असेही शेंडगे म्हणाले. 


भुजबळ काय बोलणार? 


अंबड येथील ओबीसी सभेत छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणातून सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास विरोध दाखवला. सोबतच याचवेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. जरांगे यांचे पाचवीतील शिक्षणापासून ते सासरवाडीत राहत असल्यापर्यंत भुजबळांनी आपल्या भाषणातून मुद्दे मांडले. दरम्यान, त्यांच्या टीकेला जरांगे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे, आता अंबडच्या सभेनंतर हिंगोलीमधील सभेत भुजबळ नेमकं काय बोलणार, त्यांच्या भाषणात निशाण्यावर कोण असणार?, हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhagan Bhujbal : 'भुजबळ किती जणांना पाडेल याचा विचार करा, उगाच दादागिरी करु नका'; भुजबळ पुन्हा कडाडले