बीड : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. अनेक मोठे नेते तिकीटासाठी पक्ष बदलत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्यापासून अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) गटाला सोडचिट्ठी दिली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. आता बीडमध्ये (Beed News) शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.  


निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्ष व पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर अजित पवार गटाने पक्षबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले असून शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या पक्ष पुन्हा नव्याने उभारण्यासाठी जोर लावला आहे. त्यातच आता अजित पवार गटाने शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. 


अनेक कार्यकर्त्यांचा आज अजित पवार गटात पक्ष प्रवेश 


बीड नगरपरिषदेचे माजी सभापती अमर नाईकवाडे, माजी उपनगराध्यक्ष फारुक अली पटेल, माजी उपनगराध्यक्ष मोईन मास्टर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता मुंबईत पक्षप्रवेश पार पडणार आहे. 


संदीप क्षीरसागर यांना मोठा फटका


उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. बीड मधील एक मोठा गट अजित पवारांना पाठिंबा देत असल्यामुळे संदीप क्षीरसागर यांना मोठा फटका बसणार आहे. मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर शेजारी असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. 


मावळमधील अजित पवार समर्थकांचा शरद पवार गटात प्रवेश?


दरम्यान, मावळ मतदारसंघातील अजित पवार गटाच्या 137 कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपला राजीनामा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे सोपविला आहे. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. गुरुवारी शरद पवार मावळ तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात मावळ तालुक्यातील अजित पवार गटातील 137 जण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


आणखी वाचा 


मोठी बातमी! नक्षलवाद प्रकरणी जीएन साईबाबांची जन्मठेप रद्द, जीएन साईबाबांसह पाच जणांची निर्दोष सुटका