बीड : यांना जर आमचा ग्रामपंचायत सदस्यही चालत नसेल तर आम्हालाही यांचा आमदार चालणार नाही, यापुढे ओबीसींनी ओबीसींनाच मतदान करायचं असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलं. आष्टीचा जब्या म्हणत त्यांनी भाजप आमदार सुरेस धसांवरही टीका केली. आष्टीचा जब्या विधानसभेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडे परत येईल, त्याचा निवडणुकीत कार्यक्रम करू असा इशाराही त्यांनी दिला. बीडमधील केज या ठिकाणी ओबीसी समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नवनाथ वाघमारे बोलत होते.
आमचे उष्टे खायला आले, आमच्याही खाले गेले
शरद पवारांवर टीका करताना नवनाथ वाघमारे म्हणाले की, "मराठा समाजाच्या शिक्षण, नोकरीतील आरक्षणाला कधी विरोध केला नाही. पण बारामतीच्या करामतीने ओबीसींना अडचणीत आणण्यासाठी अंतरवाली सराटीतून आंदोलन उभा केले. आपण किती दिवस शांत बसणार? आता 'करो व मरो'ची परिस्थिती आहे. हाकेंनी म्हटलं की आमच्या पोरांना पोरी द्या, मग आग लागली. आग लागायचं कारण नव्हतं. आमचे उष्टे खायला आले म्हणजे आमच्याही खाली गेले."
सुरेश धसांवर टीका
नवनाथ वाघमारे म्हणाले की, "मनोज जरांगे हा छगन भुजबळ आणि पंकजा ताईंवर बोलतोय, त्याची लायकी आहे का? आष्टीचा जब्या विधानसभा आली की पुन्हा पंकजाताई आणि धनंजय मुंडेंकडे येईल. येणाऱ्या विधानसभेला जब्याचा आम्ही कार्यक्रम करू. निजामाच्या विचाराच्या लोकांना आता मतदान करायचे नाही. याने जर थोडी दाढी वाढवली तर हा निजामासारखा दिसेल. याला निजामी गॅझेट नुसार आरक्षण पाहिजे."
निझामाचे गॅझेट का लागू केले?
सरकारला संविधान मान्य नाही का? मग हैदराबाद कसे काय लागू करू शकता? धनगर, बंजारा समाजाने अनेक वर्षापासून आंदोलन केले, तेव्हा कळले नाही हैद्राबाद गॅजेट लावावे म्हणून. छत्रपतींच्या विचारांचे आम्ही वारस आहोत. हे निजामाकडे कशाला गेले होते? निजामाच्या दाढ्या करायला गेले होते का? यापुढे जशास तसे उत्तर दिले पाहिजे असं नवनाथ वाघमारे म्हणाले.
दलित, मुस्लिम ओबीीसंनी एकत्र यायला पाहिजे
नवनाथ वाघमारे म्हणाले की, "मनोज जरांगेच्या व्यासपीठावर जाऊन पाठिंबा देण्याचे काम बीडमधील लोकप्रतिनिधी करतात. मुस्लिम बांधवांना देखील कळले पाहिजे की आजवर त्यांना कोणी त्रास दिला आहे. दलित, मुस्लिम, ओबीसी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सांगितले आहे की ओबीसींची ताट वेगळे असले पाहिजे, मराठा समाजाचे वेगळे ताट असले पाहिजे. पंकजा मुंडे यांनी देखील सांगितले आहे की गेल्या वर्षी दोन वर्षात ज्या प्रमाणपत्रांचे वाटप झाले त्याची चौकशी करावी. आपल्या आंदोलनाला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांचा पाठिंबा आहे. तिकडे विदर्भात वडेट्टीवार देखील बोलत आहेत."
दसऱ्यानंतर मुंबईकडे जाणार
दसरा मेळावा झाला की सर्वांशी चर्चा करून आपल्याला मुंबईकडे निघायचे आहे. नाक दाबल्यावर जर सरकार तोंड उघडत असेल, झुंडशाहीची भाषा सरकारला कळत असेल तर आपण सुद्धा झुंडशाही करू. ओबीसी समाज जर मुंबईत गेला तर या राज्य सरकारला कुठे पळावे हे सुद्धा कळणार नाही असा इशारा वाघमारे यांनी दिला.
आपला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी काळजी त्यांनी घेतली आहे. यांना जर आमचा ग्रामपंचायत सदस्य झालेला चालत नसेल तर आम्हाला सुद्धा तुम्ही आमदार झालेले चालणार नाही. ओबीसींनी यापुढे ओबीसींनाच मतदान करायचे आहे असं आवाहन वाघमारे यांनी केलं.
ही बातमी वाचा: