Beed:ठेवीदारांचे कोट्यवधी बुडवणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कुटे सध्या कारागृहात आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेटसह अनेक व्यवसाय असणारा सुरेश कुटे जेलमध्ये असल्याचे पाहून त्याच्या बंद दुकानातून परिसरातील लोकांनी लाखो रुपयांचे कपडे लंपास केल्याची घटना समोर आली आहे. बीड शहरातील पेठबीड भागात गेल्या दीड महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. या प्रकरणी बीड पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून पंचनामा करण्यात येत आहे. यापूर्वीही कुटेच्या मालमत्तांमधून अनेक साहित्य वस्तू, चोरीला गेल्याचं उघड झालं होत. या प्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
सुरेश कुटे यांचे दुकान दीड महिन्यांपासून बंद आहे. सुरेश कुटे यांच्यावर ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, ७ जून २०२४ रोजी माजलगाव पोलिसांनी त्यांना आणि आशिष पाटोदेकर यांना अटक केली होती. तेव्हापासून कुटे हे तुरुंगात आहेत. दुकान बंद असल्याने त्याच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपड्यांची चोरून विक्री सुरू केली. या प्रकारामुळे लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
दुकानात सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती मिळताच पेठबीड पोलिसांनी कारवाई करत पाच संशयितांना ताब्यात घेतले. दुकानाची पाहणी केली असता अनेक कपड्यांचा साठा गायब असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यानंतर सुरेश कुटे यांच्या मालमत्तांवर गुन्हे दाखल झाले. याआधीही त्यांच्या इतर दुकानांमधून व घरातील साहित्य चोरी झाल्याचे प्रकरण समोर आले होते. यामध्ये काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि वस्तू गायब झाल्याची नोंद आहे.ज्ञानराधा मल्टीस्टेट आर्थिक घोटाळा प्रकरणात लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेटवर 42 हून अधिक गुन्हे
मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पथसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आली. या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर तीन लाख 70 हजार ठेवीदार, खातेदारांचे 3700 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. या प्रकरणात या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 50 शाखांचे मागच्या वर्षीचा ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं सांगितलं जातंय. ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदोर आणि अन्य ठिकाणी 50 शाखा असून साडेसहा लाख खातेदार आहेत.