Beed News : बीड (Beed) जिल्ह्यात 2011 ते 2019 या कालावधीमध्ये मनरेगा (MGNREGA) कामाची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये (Aurangabad Bench) दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या कामाच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले होते. तर आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने नरेगाच्या कामांमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी शपथपत्र दाखल करण्यात आले आहे. ज्यात आतापर्यंत या प्रकरणात काय कारवाई झाली याची माहिती देण्यात आली आहे.
 
बीडच्या जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या शपथपत्रामध्ये विविध बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. ज्यात, नरेगा घोटाळ्यातील जनहित याचिका प्रकरणी 2016 ते आतापर्यंत एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई बीड आणि अन्य एका गावातील प्रकरणाचा समावेश आहे. ज्या प्रकरणांमध्ये अपहार झाल्याचे स्पष्ट आहे, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लेखापरीक्षणातील आक्षेपाच्या आधारावर चौकशी सुरु असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत 36 अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये सहा जण निर्दोष आढळले आहेत. तर दोन जणांची वेतन वाढ थांबवण्यात आली आहे. तर, याच प्रकरणात लेखापरीक्षणातील आक्षेपावरुन 501 ग्रामसेवकांची सध्या विभागीय चौकशी सुरु असल्याचं शपथपत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. 


तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची करण्यात आली होती बदली...


बीड जिल्ह्यात नरेगामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल केल्यानंतर औरंगाबाद खंडपीठामध्ये 2021 साली या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली होती. तर, बीड जिल्ह्यात नरेगा कामांमध्ये मृत मजुरांच्या नावांना मंजुरी देण्यात आली, त्याचबरोबर अनेकांना रोखीने रक्कम देखील देण्यात आली होती. याच प्रकरणी त्यावेळचे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी वेळेत चौकशी आणि योग्य कारवाई न केल्याने त्यांची जिल्हाधिकारी पदावरुन बदली करण्यात आली होती.


अनेकांची चिंता वाढली... 


बीड जिल्ह्यात 2011 ते 2019 या कालावधीमध्ये मनरेगा कामाची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तर, प्रकरण आता न्यायालयात जाऊन पोहोचले आहे. दरम्यान, या प्रकरणी 36 अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून, तब्बल 501 ग्रामसेवकांची सध्या विभागीय चौकशी सुरु आहे. त्यामुळे, शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अनेकांची चिंता वाढली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'मनरेगा'च्या निधीत घोटाळ्याचा आरोप; शासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस