Beed Zilla Parishad Recruitment: मागील सहा वर्षापासून चर्चेत असलेल्या राज्यातील (Maharashtra News) मेगा भरती प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. यामध्ये बीड जिल्हा परिषदेच्या (Beed Zilla Parishad) वाट्याला 568 पदं आल्यानं बीड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मोठी संधी मिळणार आहे. यामध्ये आरोग्य, बांधकाम, पशुसंवर्धन विभागाची सर्वाधिक पदं आहेत. तर ही भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागणार असून या प्रक्रियेवर जिल्हाधिकाऱ्यांसह निवड समितीची नजर असणार आहे.
राज्यातील विविध जिल्हा परिषदांमध्ये 19 हजार जागांची भरती करण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काही महिन्यापूर्वी केली होती. आणि याच भरतीच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली असून यामध्ये बीड जिल्हा परिषदेत 568 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विविध 19 संवर्गामधून ही भरती होणार असून राज्यात एकाच वेळी सर्व जिल्ह्यात ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक औषध निर्माण अधिकारी कंत्राटी ग्रामसेवक बांधकाम आणि पाणीपुरवठा या अन्य विभागांचा समावेश असणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे आता जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी देखील उपलब्ध झाली आहे.
कोणत्या पदासाठी किती जागा?
या भरती प्रक्रियेमध्ये आरोग्य पर्यवेक्षक तीन जागा, आरोग्य सेवक पुरुष 40 टक्के 22 जागा, आरोग्य सेवक पुरुष 50 टक्के 104 जागा, आरोग्य सेवक महिला 284 जागा, औषध निर्माण अधिकारी 15 जागा, कंत्राटी ग्रामसेवक 44 जागा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम आणि पाणीपुरवठा 35 जागा, कनिष्ठ आलेख एक जागा, कनिष्ठ यांत्रिकी एक जागा, कनिष्ठ लेखा अधिकारी एक जागा, कनिष्ठ सहाय्यक चार जागा, मुख्य सेविका पर्यवेक्षिका सहा जागा, पशुधन पर्यवेक्षक 27 जागा, लघुलेखक निम्नस्त्रेने एक जागा, विस्तार अधिकारी कृषी एक जागा, विस्तार अधिकारी पंचायत एक जागा, विस्तार अधिकारी सांख्यिकी एक जागा, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम लघुपाट बंधारे 16 जागांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीच्या भरती प्रक्रियेत राज्यात झालेले विविध घोटाळे लक्षात घेता ही भरती प्रक्रिया आयबीपीएस कंपनीमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि सर्व भरती प्रक्रियेत निवड समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्यासह इतर निवड समितीची नजर असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Jobs 2023: इंडियन स्पेस रिसर्च आर्गेनायजेशनमध्ये विविध पदांची भरती; झटपट करा अर्ज