Maharashtra Beed Politcal Updates: क्षीरसागर कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांचे पुतणे संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी बंड केले आणि चुलत्याचा पराभव करून बीड विधानसभा निवडणुकीमध्ये (Beed Assembly Elections) निवडून आले. आता जयदत्त क्षीरसागर यांचा दुसरा पुतण्या योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, जयदत्त क्षीरसागर यांचा अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याचा निर्णय झालेला नाही.


अखिल भारतीय तैलिक समाजाचे नेते म्हणून जयदत्त क्षीरसागर यांची देशभर ओळख आहे. मात्र शिवसेनेमधून निलंबन करण्यात आल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. मध्यंतरी काही राजकीय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी व्यासपीठावर हजेरी लावली होती. मात्र अद्याप कोणत्याही राजकीय पक्षा संदर्भात त्यांचा निर्णय झालेला नाही.


जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा डॉक्टर योगेश क्षीरसागर हे मात्र आता अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार हालचाली घडत आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णया संदर्भात जयदत्त क्षीरसागर हे इच्छुक नाहीत. मात्र जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय पुतण्या योगेश शिरसागर हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.


जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून (ठाकरे गट) हकालपट्टी का केली? 


शिवसेनेच्या ठाकरे गटातून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्याला कारण ठरलं बीड नगरपालिकेच्या 70 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन. या उद्धघाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जयदत्त क्षीरसागर दिसले होते. शिवाय जिल्ह्यात शिवसेनेचं काम करत असताना क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा ना फोटो लावला, ना मुंबईत कधी त्यांची भेट घेतली. या उद्घाटन सोहळ्यात उद्धव ठाकरे याचं नावही त्यांनी घेतलं नाही, त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटानं क्षीरसागरांचं पक्षातून निलंबन केलं.