बीड : लोकसभा निवडणुकीत बीड (Beed) मतदारसंघात यंदा चांगलीच चुरस पाहायला मिळाली. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात अटीतटीची बनली होती. या मतदारसंघात जातीय तेढ पाहाला मिळालं. त्यामुळे, निवडणूक मतदानातही जातीय आधारावर मतांची विभागणी झाल्याचं येथील जाणकार सांगतात. तर, महायुतीच्या (mahayuti) उमेदवारासाठी दबावतंत्र वापरुन मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला होता. तसेच, मतमोजणी प्रक्रियेत जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना सहभागी न होऊ देण्याची मागणीही त्यांनी केली होती. आता, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी निवडणूक मतमोजणीची तयारी केली असून आज यासंदर्भाने आढावा घेतला.
जातीय संघर्षातून मोठी चर्चा ठरलेली बीड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियाची सध्या युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. बीड जिल्ह्यातील केवळ उमेदवारावरच आरोप प्रत्यारोप झाले असे नाही तर अगदी बीडच्या जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासन यांच्यावर सुद्धा उमेदवारांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले आहेत. अगदी निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा बदलावी अशी मागणी बीडचे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केली होती.
मोठ्या चूरशी च्या ठरलेल्या या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी यंत्रणेची सध्या युद्धपातळी वर तयारी सुरू आहे. बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या प्रत्येक विधानसभा निहाय ही मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीचे 14 टेबल ठेवण्यात आलेले आहेत. या 14 टेबलवरती मतमोजणीची एक फेरी ही पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी असणार आहेत.
काय म्हणाल्या जिल्हाधिकारी
सहा विधानसभा मतदारसंघाची माहिती एकत्र घेऊन शेवटी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जाहीर करण्यात येणार आहे. सर्वप्रथम पोस्टल मतदानाची मोजणी केली जाणार असून बीडमध्ये साधारण 6 हजार मतदारांची मोजणी पोस्टलमध्ये होईल. येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण घेण्यात आलं आहे, त्यांना विशेष प्रशिक्षण यासाठी देण्यात आलं असून एआरओंची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी म्हटले.
कोण होणार खासदार
बीड लोकसभा मतदारसंघात यंदा पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत झाली. येथील निवडणुकीत यंदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळाला. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा मूळ जिल्हा असल्याने आणि मराठा आरक्षणाचे केंद्र बनल्याने मराठा समाज एकटवल्याचं दिसून आलं. त्यामुळे, जातीय समीकरणावर येथील निवडणूक पार पडल्याने यंदा विजयी कोण होणार याची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे.
काही महत्वाचे मुद्दे
मतमोजणी दरम्यान टपाली मतमोजणीचा कोणताही टप्पा सुरू असेल तरी मशीन वरील मतमोजणी चालू राहील. एनकोर (ENCORE) सॉफ्टवेअरमध्ये डेटा एंट्री पूर्ण झाल्याशिवाय अंतिम निकाल जाहीर होणार नाही. व्हिक्टरी मार्जिन हे एकूण टपाली मतांपेक्षा कमी असल्यास अशा वेळी उमेदवाराने मागणी केली नसेल तरी टपाली मतपत्रिकांची फेर मोजणी केली जाईल. यावेळी अवैध ठरविण्यात आलेल्या टपाली मतपत्रिका देखील निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांच्या समोर पुन्हा एकदा तपासण्यात येतील. याबाबत निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समाधान झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.
मतमोजणी नंतर कंट्रोल युनिट सील करणे ही महत्वाची प्रक्रीया
मतमोजणी झाल्यानंतर कंट्रोल युनिट स्विच ऑफ/ बंद करावे लागणार आहे. रिझल्ट सेक्शन दिलेल्या ॲड्रेस टॅगने सील करावे लागणार आहे. बॅटरी सेक्शन मधील पॉवर पॅक बाहेर काढायचा नाही. बॅटरी सेक्शन निवडणूक आयोगाने पुरविलेल्या सिक्रेट सीलने मोहोरबंद करावे लागणार आहे. कंट्रोल युनिट त्याच्या कॅरींग केसमध्ये ठेवून तिला ॲड्रेस टॅग लावून मोहोरबंद करावे लागणारे. उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने इच्छा व्यक्त केल्यास त्यांना सीलवर सही करण्याची परवानगी द्यावी. याच पध्दतीने व्हीव्हीपॅटला सीलबंद करावे. व्हीव्हीपॅटच्या स्लिपचे रबरबॅंड काढून मगच स्लिप ड्रॉप बॉक्समध्ये ठेवावे. व्हीव्हीपॅटच्या ड्रॉप बॉक्समध्ये मतमोजणी झालेल्या सर्व स्लिप व व्हीव्हीपॅटच्या इतर स्लिप ठेवल्या आहेत याची पूर्ण खात्री करुन ड्रॉप बॉक्सचे झाकण (झडप) मोहोरबंद करावे लागणार आहे. व्हीव्हीपॅट यंत्र त्याच्या कॅरींग केसमध्ये ठेवून ॲड्रेस टॅगने मोहोरबंद करा.