बीड : जिल्ह्यातील केज जवळील महामार्गावरील टोल नाक्याजवळ गाडी अडवून गावठी कट्ट्याचा धाक दाखवून बारा ते तेरा जणांनी पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचे अपहरण केलं आणि त्याच्याकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.


गाडी थांबवून अपहरण केलं


जिल्ह्यातील अवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीचे काम करत असलेले नाशिक जिल्ह्यातील टागोर नगर येथील सुनिल केदू शिंदे (ह.मु. जालना रोड बीड) आणि त्यांचे सहकारी हे 28 मे रोजी रात्री बीडकडून केजकडे जात होते. त्यांना रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मस्साजोग ते केज दरम्यान गंगा माऊली साखर कारखान्याला जवळ असलेल्या टोल नाक्याच्या पुढे एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाने गाडी थांबवण्याचा इशारा केला.


सुनील शिंदे यांनी गाडी थांबवली असता रमेश घुले रा. केज याने अधिकारी सुनिल शिंदे यांना आपण अधिगृहन करीत असलेल्या पवनचक्कीच्या जागेसंदर्भात बोलायचे आहे असे म्हणून  त्याच्याकडील गावठी कट्ट्याचा धाक दाखवला. त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी संगनमत करुन बळजबरीने सुनिल शिंदे यांचे अपहरण केले.


दोन कोटींची मागणी केली 


सुनिल शिंदे यांना आरोपीने त्याच्या स्कार्पिओ गाडीमध्ये बसवून त्यांना माजलगाव मार्गे अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी ता.पाथर्डी येथे नेले. तेथे त्यांनी सुनिल  शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कंपनीचे काम करायचे असेल तर दोन कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देत खंडणीची मागणी केली.


दरम्यान, सुनिल शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची सुटका करून घेत केज 29 रोजी रात्री केज पोलीस ठाण्यात रमेश घुले आणि त्याचे अकरा ते बारा साथीदारांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात अपहरण करून खंडणी मागणे आणि शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्य आरोपी रमेश घुले याला ताब्यात घेऊन जेरबंद केलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ होताना दिसत आहे. पोलिसांनी अवैध धंद्यांकडे केलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी चांगलीच वाढल्याचं दिसून येत आहे. आता या अवैध धंद्यावर पोलिस नियंत्रण मिळवणार का हे पाहावं लागेल.


ही बातमी वाचा :