बीड :  मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून (Maratha Reservation Protest)  बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ (Beed Violence) करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी दहा टोळ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले असून 254 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पाच मुख्य आरोपींचा समावेश असल्याची माहिती देखील बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. तर 300 जण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


बीडमधील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 2000 हून अधिक लोकांची पोलिसांनी चौकशी केली आहे. यामध्ये 254 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर 17 अल्पवयीन मुले देखील या जाळपोळ आणि दगडफेकीमध्ये सहभागी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीला अद्याप जामीन मिळालेला नाही. तर 13 आरोपींनी जामिनासाठी बीडच्या कोर्टात अर्ज केला होता. मात्र, त्यांचा देखील जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. आतापर्यंत जे आरोपी पोलिसांनी अटक केले आहेत यामध्ये सर्वजण हे बीड जिल्ह्यातील आहेत. एकही आरोपी हा जिल्ह्याबाहेरचा आरोपी नसल्याचे निष्पन्न झालं असल्याची माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. 


पोलिसांनी या तपासात सीसीटीव्ही फूटेजचाही आधार घेतला.  आतापर्यंत जे आरोपी निष्पन्न केले आहेत त्यांच्या जवाबावरून आणखी 300 लोकांची ओळख पटली आहे. त्यांचा देखील शोध पोलीस घेत आहेत. 


शासकीय कार्यालयांसह आमदारांच्या घरांची जाळपोळ


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे जालन्यात उपोषण आंदोलनात बसले असताना दुसरीकडे बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक वळण घेतले. 


30 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले. सोबतच माजलगाव नगरपरिषदेच्या (Majalgaon Nagarparishad) इमारतीलादेखील आग लावण्यात आली. याचवेळी बीड शहरातील बस स्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसेसची तोडफोड करण्यात आली होती.


बीडमधील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयं, राजकीय पक्षांची कार्यालयही आंदोलकांच्या तावडीतून सुटली नाहीत. त्यामुळे जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 


जाळपोळीतील नुकसानीची आरोपींकडून भरपाई होणार


बीड शहर आणि माजलगाव मध्ये झालेल्या हिंसाचारात अकरा कोटी रुपयांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील आरोपीकडून केली जाणार असून तसा अहवाल तयार होत आहे. आरोपींनी ही भरपाई दिली नाही तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली होईल असे पोलिसांनी याआधीच स्पष्ट केले आहे.