बीड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात तापला असतानाच, याचा फटका प्रशासनाला देखील बसतांना पाहायला मिळत आहे. कारण असाच काही प्रकार बीड (Beed ) जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे गावकऱ्यापर्यंत पोहोचावे त्यासाठी आपला संकल्प विकसित भारत योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेली विकास यात्रा गावकऱ्यांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. बीडच्या मुळकवाडी गावातील ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाचा प्रश्नावरून गावाच्या वेशिवरूनच विकास यात्रा परत पाठवल्याची घटना समोर आली आहे.
अधिक माहितीनुसार, 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी कालावधीत केंद्र सरकारच्या विविध योजनांची देशव्यापी मोहीम केंद्र राबविण्यात येत आहे. आज बीड तालुक्यातील मुळुकवाडी इथे याच योजनांचा विकास यात्रा रथ आला होता. तर, मराठा आरक्षणासाठी याच गावात साखळी उपोषण सुरू असून, आंदोलनकर्त्यांनी विकास यात्रा रथ गावच्या वेशीवरच अडवली. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शासनाचे कुठलेच कार्यक्रम गावात होऊ देणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे विकासाचा रथ घेऊन आलेले प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी आल्या पायी परत निघून गेले.
मराठा आंदोलकांमध्ये रोष...
मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही आंदोलन सुरूच आहे. अनेक गावात आजही साखळी उपोषण करण्यात येत आहे. मात्र, सरकार आणि शासन यावर लवकर निर्णय घेत नसल्याने मराठा आंदोलकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे, अनेक गावात नेत्यांना गाव बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, आता शासकीय योजनांना देखील विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रशासनाची भारत संकल्प यात्रा
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी पात्रता असूनही ज्या लोकांना विकासाच्या प्रवाहात येता आले नाही, त्यांना शासकीय योजनांचा विविध लाभ मिळावा या उद्देशाने प्रशासनाकडून विकसित भारत संकल्प यात्रा काढली जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात यासाठी विकास रथ यात्रा देखील काढली जात आहे. अनेक योजनांची माहिती लोकांपर्यंत व्यवस्थीत न पोहचल्याने त्यांच्या मनात अनेक योजनांबाबत संभ्रम असतो. तो संभ्रम दूर व्हावा, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि योजनांच्या पात्रतेविषयी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता करता यावी असा उद्देश घेऊन योजनांची प्रचार, प्रसिद्धी व्हावी यादृष्टिने विकसित भारत संकल्प यात्रा हाती घेण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange : 'एडपट, माझ्या नादी लागू नको'; मनोज जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल