बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण आणि हत्या त्याचबरोबर खंडणी मागितल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याची सध्या चौकशी सुरू आहे. वाल्मिक कराडवरती (Walmik Karad) याआधी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत, बीड जिल्ह्यामध्ये त्याची दहशत, वचक याबाबत अनेक दावे केले जात आहेत. वाल्मिक कराड (Walmik Karad) मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा असल्याने त्यावरती राजकीय वरदहस्त असल्याचंही बोललं जात आहे, इतके आरोप प्रत्यारोप आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समितीच्या अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड (Walmik Karad) कायम असल्याचं दिसून येत आहे. ही निवड बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून झाली होती अशी माहिती आहे. कराडवर अनेक गुन्हे दाखल असताना देखील त्याला लाडकी बहीण योजनेवर कसं घेतलं, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, त्याचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप देशमुख कुटूंबासह गावकऱ्यांनी केला, त्याचबरोबर केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीचे कार्यालय आहे. तेथील एका अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड याच्यासह विष्णु चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास सीआयडी करीत आहे. वाल्मिक कराड संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून फरार असल्याची चर्चा होती, मात्र काही दिवसांमध्ये तो पुण्यात सीआयडीला शरण आला होता, तर चाटे याला बीड शहराजवळ पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सध्या दोघेही पोलिस कोठडीत आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.
लाडकी बहीण समितीमध्ये कोण आहेत?
बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीने जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत एक समिती तयार केली होती. त्याप्रमाणे परळी मतदारसंघाच्या समितीच्या अध्यक्षपदी वाल्मिक कराड याची नियुक्ती केल्याची माहिती आहे. यासह इतर दोन अशासकीय सदस्य आणि काही अधिकारी, कर्मचारीही या समितीचे सदस्य आहेत.
दरम्यान एका वृत्तसंस्थेने या समितीमध्ये बदल करण्यात आलेला आहे का, यासंबंधीची माहिती मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, . त्यांनी फोन न घेतल्याने संबंधीत बाजू समजली नाही. लाडकी बहीण योजनेसह जिल्हा नियोजन समितीवरदेखील वाल्मिक कराड सदस्य आहे. यामुळे आता चर्चा सुरू आहेत.