बीड : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत आहेत. अशात ते आज बीड (Beed) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, याचवेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून मोठा दावा केला आहे. मला कधीही अटक होण्याची शक्यता असून, त्याबाबत अहवाल देखील तयार असल्याचं जरांगे म्हणाले आहेत.
दरम्यान यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “न टिकणारे दहा टक्के आरक्षण मराठ्यांना देण्यात आले आहे. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू आहेत. सरकारने आमची फसवणूक केली आहे. सत्तेत मी काटा आहे. मला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. तसा अहवाल तयार झाला असल्याचे" मनोज जरांगे म्हणाले आहेत.
लोकसभेला मराठा उमेदवार रिंगणात उतरवणार...
आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्यासाठी तयारी सुरु असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की, “मराठ्यांनी इतरांना आडवे करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. समाजाचा निर्णय हा अंतिम राहील. लोकसभेला जे उमेदवार पन्नास-साठ हजार उभे राहतील तो त्यांचा अधिकार असल्याचे जरांगे म्हणाले.
मला बाजूला सारण्याचा प्रयत्न
"गुन्हे दाखल करताय, आज आमच्यावर वेळ आहे. उद्या हीच वेळ तुमच्यावर येणार आहे. कितीही दबाव येवू द्या, मराठा एक इंच देखील मागे हटणार नाही. आमचेच काही आमदार आहेत. माझी माहिती त्यांना पुरवीत आहेत. आज त्यांचं नाव मी घेणार नाही, पण असे 36 आमदार आहेत. सत्ता आणि मराठ्यातला मी काटा आहे. म्हणून मला बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे" जरांगे म्हणाले.
आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेतली...
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने बीड तालुक्यातल्या गवळवाडी येथील तरुणाने आत्महत्या केली होती. याच तरुणाच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी मनोज जरांगे पाटील आज गवळवाडी येथे पोहचले. जरांगे पाटील हे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, गवळवाडी गावात त्यांनी धीरज मस्के या आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी नारायण गडचे महंत शिवाजी महाराज हे देखील उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. गवळवाडी येथे त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहात देखील भेट देऊन मराठा समाज बंधवाशी सवांद साधला.
इतर महत्वाच्या बातम्या :