Beed News: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टोकाचे राजकीय विरोधक असणाऱ्या दोन राजकीय नेत्यांमध्ये मागच्या काही दिवसापासून मनोमिलन होते का? अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे एकत्रित येणार का अशा चर्चा बीडमध्ये सुरू झाल्या आहेत. मागील काही कार्यक्रमांतील वक्तव्यांमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि ओबीसीच्या नेत्या पंकजा मुंडे या बहीण भावातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कधी भाजपाचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार म्हणून तर कधी राज्यातील ओबीसी चे नेते म्हणून हे दोन नेते कायम एकमेकांच्या समोर उभा ठाकले असल्याचे दिसून आले. मात्र भारजवाडी येथील एका सप्ताहाच्या कार्यक्रमात या दोन नेत्यांनी अस सूचक वक्तव्य केलं आणि दोघे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे मध्ये झालेला संघर्ष राज्यभर गाजला. केवळ राजकीय आरोप नाही तर वैयक्तिक आरोपामुळे सुद्धा धनंजय विरुद्ध पंकजा मुंडे हा टोकाचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने बघितला. आता हा राजकीय संघर्ष संपुष्टात आलाय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडीमधील अध्यात्मिक कार्यक्रम या चर्चेचे निमित्त ठरलं आहे. या कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांची स्तुती केली तर कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोन असले तर काय झालं असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या
यापूर्वी अनेक वेळा एकाच व्यासपीठावर असून सुद्धा एकमेकांवर टोकाची टीका करणारे हे दोन बहिण भाऊ संत भगवान बाबाच्या नारळी सप्ताहात मात्र एकमेकाचे स्तुती सुमने गात होती. एवढेच नाही तर धनंजयवर कोणताच आरोप नाही असं म्हणून माझा भाऊ मोठा झाल्याचा मला आनंदच आहे असं त्या म्हणाल्या.
याच व्यासपीठाहून बोलताना धनंजय मुंडे यांनी सुद्धा पंकजा मुंडे ही आपली लहान बहीण असून ती जर भगवान गडाची पायरी असेल तर मी त्या पायरीचा दगड व्हायला तयार आहे, असं म्हणून पंकजा आणि आपल्यात कोणतेच वाद नाहीत असेच जणू अधोरेखित केलं आहे. आमचे जरी विचार वेगळे असले तरी आमच्यामध्ये सुविचार टोकाएवढही वैर नसल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे हयात असतानाच धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यापासून राजकीय फारकत घेतली. इथूनच गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा राजकीय संघर्ष दिसून आला. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाची धुरा आली. मात्र, याही काळात त्यांना धनंजय मुंडे यांच्यासोबत मोठा संघर्ष करावा लागला.
दोघांनीही एकाच व्यासपीठावर येऊन एकमेकांची स्तुती केल्यानंतर कौटुंबिक हितासाठी आणि बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जर एकत्र यायच ठरवलं असेल तर याचा फायदा जिल्ह्याला निश्चितच होईल देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. तर भविष्यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र आले तर ते भाजपमध्येच एकत्र येऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्हीही राजकीय नेते एकमेकांच्या व्यासपीठावर येणं सुद्धा टाळत होते. आता मात्र एकाच व्यासपीठावर येऊन एकमेकाबद्दल स्तुतीसुमनं उधळत असतानाच आपल्यात आता काही अंतर नाही असं जणू हे राजकीय नेते सुचवत आहेत. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन बहीण-भाऊ एकत्रित दिसतील का असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.