बीड : स्त्रीभ्रूण हत्येचा कर्दनकाळ ठरलेल्या डॉक्टर सुदाम मुंडे याच्या कृष्णकृत्यानंतर आता पुन्हा एकदा एका विवाहित महिलेचा निर्दयीपणे गर्भपात केल्याची घटना परळी मध्ये पुढे आली आहे. मुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा निर्दयीपणे अवैध गर्भपात केल्याची घटना परळीत उघडकीस आली आहे या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून सासू, पती आणि डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


परळी शहरातल्या शिवाजीनगर भागात राहणाऱ्या सरस्वती नारायण वाघमोडे यांचा दोन वर्षांपूर्वी नारायण वाघमोडे यांच्याशी विवाह झाला. गेल्या वर्षी त्यांना एक मुलगी ही झाली, सरस्वती पुन्हा गर्भवती राहिल्याने पहिल्यांदा मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच हवा या हव्यासापोटी पती नारायण आणि सासूने बळजबरीने त्यांचं गर्भलिंग निदान केलं. त्यामध्ये मुलगीच असल्याचं समजलं आणि त्या दिवशीपासून सासू आणि पतीने सरस्वती यांच्याकडे गर्भपात करण्याचा तगादा लावला.


मुलगी आणि मुलांमध्ये भेद न करता सरस्वती यांनी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे पती नारायण आणि सासू यांच्यासोबत सरस्वतीचा वारंवार वाद होऊ लागला.  एके दिवशी सरस्वती आजारी पडल्याची संधी साधून पती आणि सासूने शहरातील स्वामी नावाच्या एका डॉक्टरला घरी बोलावलं तापाचे इंजेक्शन देतो म्हणून डॉक्टरांनी सरस्वतीला गर्भपाताचे इंजेक्शन टोचलं.


 इंजेक्शन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरस्वतीला पोटामध्ये त्रास होऊ लागला त्यानंतर सासू आणि पतीने पुन्हा डॉक्टर स्वामी यांना आपल्या घरी बोलावलं आपल्याला गर्भपाताचे इंजेक्शन दिल्याचं सरस्वतीच्या लक्षात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. सरस्वतीच्या गर्भ पिशवीला छिद्र करून गर्भ बाहेर काढावा लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आणि निर्दयतेचा कळस गाठून डॉक्टरांनी तिच्या गर्भपिशवीतून कापून गर्भ बाहेर काढला. आपला गर्भपात झाल्याचे कुणाकडे सांगितले तर तुला जिवे मारून टाकू अशी धमकी यावेळी सरस्वतीला तिचा पती नारायण आणि सासूने दिली.


घडलेली सर्व आपबीती सरस्वतीने पुण्यात राहणाऱ्या आपल्या भावाला सांगितले. त्यानंतर तो तात्काळ पडली दाखल झाला आणि तिच्या पतीला आणि सासूला विनंती करून सरस्वतीला आपल्या सोबत पुण्याला घेऊन गेला. पुण्याला गेल्यानंतर सरस्वतीची तब्येत अधिकच खालावली आणि अखेर तिने आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी थेट परळीचा संभाजीनगर पोलीस ठाणे गाठलं. आपला बळजबरीने गर्भपात केल्याप्रकरणी पती नारायण वाघमोडे सासू छाया वाघमोडे डॉक्टर स्वामी आणि प्रक्षा कावळे या चौघा विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी ही विलंब न करता या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


गेल्या काही दिवसापूर्वी अशाच पद्धतीने अवैध गर्भपात झाल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर बीड पोलिसांनी गर्भलिंग निदान करणार रॅकेट पकडल्याचा दावा केला होता मात्र अजूनही बीड जिल्ह्यामध्ये गर्भलिंग निदान करून अवैध गर्भपात करणारे निर्दयी डॉक्टर आपला व्यवसाय चालवत असल्याच समोर आल आहे त्यामुळे अशा डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याची मागणी  होऊ लागली आहे