Beed News: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भगवान बाबा यांच्या जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र सुपे सावरगाव (घाट) येथे दसरा मेळावा भरणार असल्याची माहिती कृती समितीने पत्रकार परिषदेतून दिली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात यावर्षी दोन दसरा मेळावे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भगवान गडाच्या पायथ्याशी एक तर दुसरा सावरगाव येथे दसरा मेळावा होणार आहे.
गेल्यावर्षी कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याने यावर्षी निर्बंध मुक्त वातावरणात दसरा मेळावा होणार असल्याची माहिती दसरा मेळावा कृती समितीने दिली आहे. औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.
कोरोनानंतर पहिला मेळावा...
सुरुवातीचे अनेक वर्ष भगवानगडावर हा मेळावा आयोजित केला जात होता. पंरतु मेळाव्याचे ठिकाण अचानक बदलून सुपे सावरगाव येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा दसरा गेल्या काही वर्षांपासून भरवला जात आहे. या मेळाव्यामध्ये नागरिक राज्यभरामधून व परराज्यातुन देखील उपस्थित राहतात. यावेळी पंकजा मुंडे यांचे प्रमुख भाषण दरवर्षी होते. तसेच इतर काही राजकीय नेत्यांचे सुद्धा भाषण या दसरा मेळाव्यात होते. गेल्यावर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे मोजक्या लोकांना मेळाव्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र तरीही मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता यावर्षी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष...
सावरगावात होणाऱ्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे दरवर्षी सर्वांचे लक्ष असते. तर गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या सतत येत असतात. त्यातच आता पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या एका विधानामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांना लवकरच बीडचं पालकमंत्री पद लाभावं असे विधान त्यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या...
Dasara Melava : शिंदे-शिवसेनेत वाद सुरु असतानाच राज्यात आणखी एक 'दसरा मेळावा' होणार
Dasra Melava: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर आता भगवान गडाचा दसरा मेळावा 'वादा'त