Beed Crime News : चालू वर्षातील आत्महत्यांच्या घटनांनी बीड जिल्हा हादरला असून, धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांपाठोपाठ विद्यार्थीही टोकाचे पाऊल उचलत असून, आठ महिन्यांत 15 मुलांनी आणि 10 मुलींनी आत्महत्या केली आहे. नैराश्य, व्यसनाधीनता, दारिद्र्य, दुर्धर आजार, कौटुंबीक कलहातून आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


बीड जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान 384 जणांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलल्याची नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात 16 तासाला 1 जण आत्महत्या करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे अनेक आत्महत्या शुल्लक कारणावरून केल्याचे सुद्धा समोर आले आहे. 


अशी आहे आकडेवारी...


जानेवारी ते ऑगस्ट या दरम्यान 384  जणांनी आत्महत्या केली आहे. ज्यात या आठ महिन्यांत 15  मुलांनी, तर 10 मुलींनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. मागील काही दिवसांपासून आत्महत्या केल्याची आकडेवारी पाहिली तर 2020 मध्ये 567 आत्महत्या झाल्या होत्या. 2021 मध्ये हा आकडा वाढून 633 पोहचला. त्यातच आता या चालू वर्षात गेल्या आठ महिन्यात 384 जणांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांपाठोपाठ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 


विवाहित महिलांनीही जीवन संपवले


शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्यासोबतच विवाहित महिलांनी सुद्धा टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात आठ महिन्यांत 33 विवाहित महिलांनी जीवन संपवले असून, लग्नानंतर सात वर्षांच्या आतच आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित महिलांची संख्या 19 आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील आत्महत्यांचे प्रमाण वाढतांना पाहायला मिळत असून, ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. 


शेतकऱ्यांचा आकडा सर्वाधिक...


बीड जिल्ह्यातील आत्महत्यांच्या आकडेवारीत सर्वधिक आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. गेल्या सात महिन्यात म्हणजेच 206 दिवसांत मराठवाड्यातील तब्बल 515 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. ज्यात सर्वाधिक 153 शेतकरी बीड जिल्ह्यातील आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सततची नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. 


महत्वाच्या बातम्या... 


Beed Crime : परळीत मामानेच केला धारदार शस्त्राने चार वर्षाच्या भाच्याचा खून


Crime: 'माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा कुठे तोंड दाखवायला...', महिला पोलीस अंमलदारास धमकी