Beed Crime News: पोलीस दलात खळबळ उडवून देणारी घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, अशी धमकी देत महिला अंमलदारास सहकारी अंमलदाराने ब्लॅकमेल केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यानंतर पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक म्हणत आरोपी अंमलदाराच्या पत्नीने पिडीत महिला अंमलदारास धमकावण्याचा प्रयत्न केला. यावरून दाम्पत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. कॉ. हरिश्चंद्र खताळ व पो.ना. शिवकन्या निंगळे अशी आरोपींची नावे आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की,  हरिश्चंद्र आणि शिवकन्या हे दोघे पती-पत्नी आहेत. तर हरिश्चंद्र खताळ व पीडित महिला अंमलदार ग्रामीण ठाण्यात कार्यरत असून, शिवकन्या निंगुळे शहर ठाण्यात कर्तव्य बजावत आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, 2021 पासून ते 27 ऑगस्ट 2022  पर्यंत हरिश्चंद्र खताळ याने माझ्यासोबत जवळीक कर,  माझी इच्छा पूर्ण कर, असे म्हणत कर्तव्यावर असताना व्हॉटसअॅप मेसेज करून व अश्लील इशारे करून त्रास दिला.


घरात घुसून विनयभंग...


दरम्यान,  8 सप्टेंबर रोजी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास हरिश्चंद्र पिडीत महिला अंमलदाराच्या घरी आला. येऊन माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, असे म्हणत धमकावून विनयभंग केला. याचवेळी त्याची पत्नी शिवकन्या निंगुळे हेने पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक नाहीतर तुझ्यावर आणि तुझ्या नातेवाइकांवर 306 नुसार गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करीन, तुला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी दिली. 


पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल...


हरिश्चंद्र हा पिडीत महिला अंमलदाराला सतत त्रास देत होता. गेल्या वर्षभरापासून हा त्रास सुरु होता. मात्र अशातच थेट घरात घुसून हरिश्चंद्रने पीडितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याची पत्नीने सुद्धा धमकी दिल्याने अखेर पिडीत महिला अंमलदाराने पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल केला. त्यामुळे पो. कॉ. हरिश्चंद्र खताळ व पो.ना. शिवकन्या निंगळे पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलीस दलात खळबळ...


या घटनेने बीड जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतः पोलीस असतांना सहकारी पोलीस कर्मचाऱ्यासोबत अशाप्रकारे वागण्याने हरिश्चंद्र आणि तिच्या पत्नीबदल नाराजी व्यक्त केली जात आहे. तर गुन्हा दाखल झाल्यावर याबाबत पोलीस कर्मचारी एकमेकांना फोन करून खरच गुन्हा दाखल झाला का? याबाबत माहिती घेत होते. त्यामुळे महिला पोलिसाने सहकारी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली.