Beed News: भाजप नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde) मुख्य मार्गदर्शक असलेल्या आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) संचालक असलेल्या परळी येथील दी. वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेला बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 24 जानेवारी रोजी कोट्यवधींच्या गैरव्यवहारासंदर्भात नोटीस बजावली आहे. तर 31 जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे बँकेला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 


अधिक माहिती अशी की, कळंब (जि. उस्मानाबाद) येथील शंभू महादेव कारखान्याच्या लिलावात अटी, शर्थीचे उल्लंघन केल्याचा वैद्यनाथ बँकेवर आरोप आहे. दरम्यान वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचे सभासद सुभाष कारभारी निर्मळ (रा. आर्य समाज मंदिराजवळ, परळी) यांनी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात 5 जानेवारी 2023 रोजी अर्ज देऊन गैरव्यवहराची चौकशी करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली होती. तर तक्रारीचे अर्ज आल्याने पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार तपासाचा भाग म्हणून, दी. वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. तर 31 जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे बँकेला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 


सुभाष कारभारी निर्मळ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार करत वैद्यनाथ बँकेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपाधीक्षक संतोष वाळके यांनी सहायक निरीक्षक सुजित बडे यांच्याकडे चौकशी सोपविली आहे. त्यानुसार चौकशीचा भाग म्हणून, अर्जातील आरोपाच्या अनुषंगाने म्हणणे सादर करण्यासाठी दी. वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचे चेअरमन विनोद सामत व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खर्चे यांना सहायक निरीक्षक बडे यांनी नोटीस बजावली आहे. तसेच 31 जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे. विशेष म्हणजे याच दी. वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेच्या मार्गदर्शक म्हणून पंकजा मुंडे तर संचालकपदी खासदार डॉ. प्रीतम मुंडे या आहेत. 


तक्रारदाराचे आरोप? 


सुभाष कारभारी निर्मळ यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, संपूर्ण रक्कम जमा होण्यापूर्वी कारखान्याचा ताबा दिला. शिवाय तात्काळ बेकायदेशीररीत्या कर्ज वितरण केले. वैद्यनाथ बँकेची 65 कोटी व इतर बोजा 41 कोटी अशी एकूण 106 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असा सुभाष निर्मळ यांचा आरोप आहे. तसेच वैद्यनाथ बँकेकडे हावरगाव (ता. कळंब) येथील शंभू महादेव शुगर अलाइड इ.प्रा.लि. कारखाना गहाण होता. त्यावर वैद्यनाथ बँकेसह इतर बँकांचा बोजा होता. शंभू महादेव कारखान्याने मुदतीत कर्ज रक्कम परत न केल्याने कारखाना लिलावात काढला. मात्र, लिलाव प्रक्रियेत अटी, शर्थीचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप सुभाष निर्मळ यांनी केला आहे. 


बँकेची प्रतिक्रिया...


यावर वैद्यनाथ बँकेचे सीईओ विनोद खर्चे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,  हे प्रकरण आधीच उच्च न्यायालयात सुरु आहे. परळी शहर पोलिस ठाण्यातही संबंधितांनी तक्रार दिली होती. तेथे आम्ही आमची बाजू मांडलेली होती. आता 31 जानेवारीला आर्थिक गुन्हे शाखेकडे आम्ही आमचे म्हणणे सादर करू असे विनोद खर्चे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


बावनकुळेंच्या आधी पंकजा मुंडेंचा भाषण करण्याचा हट्ट, पण व्हिडीओ एडिट करून व्हायरल; यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल