Maharashtra political crisis: एकनाथ शिंदे यांच्यासह बंड केलेल्या शिवसेना आमदारांच्या विरोधात अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांच्या समर्थनात सुद्धा कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. दरम्यान मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या वतीने बीड जिल्ह्यातील परळी येथे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  


मराठा क्रांती ठोक मोर्च्याचे राज्य समन्वयक अमित घाडगे यांच्या नेतृत्वाखाली परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तानाजी सावंत यांच्या समर्थनात जोरदार घोषनाबाजी करण्यात आली. तर यावेळी समर्थकांनी 'निर्णय तुमचा साथ आमची' अशा आशयाचे बॅनर लावून त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. यावेळी सावंत यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडले.


हल्ले खपवून घेणार नाही....


तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज भागातील ऑफिसवर काही दिवसांपूर्वी जो हल्ला करण्यात आला होता. त्याचा निषेध देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच यापुढे असे भ्याड हल्ले खपून घेतले जाणार नाही. पुन्हा असे घडल्यास आमच्याकडूनही जशास तसे उत्तर दिले जाईल अशा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला.


औकातीत राहावं!


शिवेसेनेचे भूम-परांडा तालुक्याचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली होती. सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर तानाजी सावंत यांनी जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं असे म्हटलं होतं. आमचे गटनेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही सावंत यांनी दिला होता. 
 
यामुळे केली बंडखोरी...


तानाजी सावंत भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. 2014 साली शिवसेना भाजपच्या सत्तेत तानाजी सावंत यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, 2019 ला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनेनं तानाजी सावंत यांनी मंत्रीपदाची संधी दिली नाही. तेव्हापासूनच तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा होती. अखेर बंडखोरी करत ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.