ED CBI Raid In Beed : बीडच्या (Beed) धारूर तालुक्यात असलेल्या मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखान्यावर रात्रीपासूनच ईडी (ED) आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरु आहे. या कारखान्यात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर कारवाईच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे. 


बीडच्या धारूर तालुक्यातल्या मुंगी गावच्या पांडुरंग सोळंके यांनी 2010 साली शिवपार्वती सहकारी साखर कारखान्याची उभारणी करायला सुरुवात केली आहे. त्यात त्यांनी नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांना सोबत घेऊन एक एमओयु साइन केला. त्यानंतर काही काळ उलटला आणि नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी बनावट दस्तऐवज तयार करून हा कारखाना स्वतःच्या नावे करून पांडुरंग सोळुंके यांना बाजूला केलं. पुढे 2013 साली याच कारखान्याच्या नावावर तासगावकर कुटुंबीयांनी 106 कोटी रुपयांच कर्ज पंजाब नॅशनल बँक आणि इतर दोन बँकांकडून घेतलं. मात्र बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च करून कारखान्याचे काम अर्धवट सोडलं आणि कारखाना दिवाळखोरीत निघाला. 


ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांची एन्ट्री


तर शिवपार्वती साखर कारखान्याचे बनावट दस्तऐवज तयार करून कारखाना स्वतःच्या नावावर करून घेऊन, त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पांडुरंग सोळंके यांनी 2022 मध्ये बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र बीड पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी थेट एनसीएलटी आणि आरवोसी यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान या कारखान्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच ज्या बँकेकडून कर्ज घेण्यात आले, त्यांनी हा कारखाना लिलावात काढला. मात्र याचवेळी यात ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एन्ट्री केली आहे. आता यामध्ये नेमकी सोळंके किंवा तासगवकर यांची चौकशी होत आहे, याबाबत ईडी आणि सीबीआयच्या छाप्यानंतरच उघड होणार आहे.


रात्रीपासून कारवाई सुरु…


बीडच्या धारूर तालुक्यात असलेल्या शिवपार्वती साखर कारखान्यावर रात्रीपासूनच ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरु आहे.  शिवपार्वती साखर कारखान्यात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्या प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. तर या कारवाईने कारखान्याशी संबधित लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाई दरम्यान ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून काही कागदपत्रे तपासली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र कारवाईत नेमकं पथकाच्या हाती काय लागले आणि हा सर्व तथाकथित घोटाळा नेमका काय आहे हे छापेमारी संपल्यावर समोर येण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Beed Crime : तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण, 14 तासात आरोपीला बेड्या