Beed News : बीड (Beed) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी इस्रोसह नासाला भेट देणार आहेत. यामध्ये 33 विद्यार्थी हे श्रीहरीकोटा येथील इस्त्रोच्या स्पेस सेंटरला भेट देणार आहेत तर 11 विद्यार्थी अमेरिकेतील नासामधील स्पेस सेंटरला भेट देतील अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी दिली आहे.

 

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्याचबरोबर संशोधन वृत्तीचा विकास व्हावा आणि शास्त्रज्ञाच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच, इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेच्या माध्यमातून यासाठी निवड करण्यात येणार आहे. 

 

स्पर्धा परीक्षेतून होणार विद्यार्थ्यांची निवड

 

नासा आणि इस्रोच्या सहलीसाठी या विद्यार्थ्यांची 27 फेब्रुवारीला बीड जिल्ह्यातील केंद्रस्तरावर स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेतून तालुकास्तरीय परीक्षेसाठी विद्यार्थी निवडले जातील त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील तीन विद्यार्थी याप्रमाणे बीड जिल्ह्यातील 30 विद्यार्थ्यांना श्रीहरीकोटा येथील इसरोच्या स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी मिळणार आहे. तर, या 33 विद्यार्थ्यांमधून 11 विद्यार्थी हे अमेरिकेतील नासा येथील स्पेस सेंटरला भेट देणार आहेत.

 

स्पेस सेंटर बरोबरच या विद्यार्थ्यांना थुंबा स्पेस म्युझियम तिरुअनंतपुरम, केरळ त्याचबरोबर विश्वेश्वराय इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियम बेंगलोर या ठिकाणची देखील सहल घडविण्यात येणार आहे.

 

आजच्या काळात विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी उत्सुकता वाढावी हा देखील या उपक्रमामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. याचं कारण म्हणजे आजचे विद्यार्थी हे उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवणारे आहेत. त्यामुळे आत्तापासूनच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास व्हावा यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच, जिल्हा परिषद शाळेत अशा प्रकारचे उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील कुतुहूल वाढते. 

 

ISRO विषयी थोडक्यात...

 

ISRO (Indian Space Research Organisation) ही भारताची एक राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे जी भारतातील अंतराळाशी संबंधित कार्य करण्यासाठी 1969 मध्ये स्थापन करण्यात आली होती. सध्या इस्रोचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. इस्रोने गेल्या काही वर्षांत अनेक यश संपादन केले आहे.

 

नासाविषयी थोडक्यात...

 

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासा, (National Aeronautics and Space Administration, NASA) ही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे. 1958 मध्ये नासाची स्थापना करण्यात आली आणि एरोनॉटिक्ससाठी राष्ट्रीय सल्लागार समिती (एनएसीए)ची स्थापना केली.

महत्त्वाच्या बातम्या :