Beed News: बालविवाह (Child Marriage) चिंतेचा विषय बनला असून, यासाठी प्रशासनाकडून अनेक उपयोजना केल्या जात आहे. दरम्यान आता याबाबत महिला आयोगाने (Women Commission) देखील पुढाकार घेतला आहे. ज्या ग्रामपंचायत हद्दीत बालविवाह झाला असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित सरपंच, पोलीस पाटील यांचे पद रद्द करावे व विवाहाची खोटी नोंद घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, या आशयाचा प्रस्ताव राज्य महिला आयोगाने शासनाला दिला आहे. तर याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली आहे. बीड जिल्ह्याच्या (Beed District) दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 


बालविवाह आयोजित करणारे, भटजी व मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात येते. मात्र अनकेदा त्या गावातील लोकप्रतिनिधी देखील अशा बालविवाहच्या ठिकाणी उपस्थित असतात. तसेच गावातील पोलीस पाटील यांना देखील अनेकदा माहिती असताना ते याबाबत पोलिसांना कळवत नसल्याचे काही ठिकाणी समोर आले आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी ज्या ग्रामपंचायत हद्दीत बालविवाह झाला असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित गावाचे सरपंच, पोलिस पाटील यांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव महिला आयोगाने प्रशासनाकडे दिला आहे. सोबतच विवाहाची खोटी नोंद घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, या आशयाचा प्रस्ताव देखील राज्य शासनास दिल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.


जिल्ह्यातील महिलाबाबत गुन्हे आकडेवारी 


बीड जिल्ह्यात एकच स्वाधार केंद्र असून, परळी व अंबाजोगाईत महिलांवर अत्याचार अधिक होत असल्याने त्या ठिकाणी स्वाधार केंद्र प्रस्तावित आहेत. 2022-23 मध्ये महिला अत्याचाराचे 156 पैकी 117 गुन्हे निकाली निघाले आहेत. पोस्कोंतर्गत 130 पैकी 88 गुन्हे निकाली निघाले, तर मिसिंग तक्रारी 570 पैकी 506 मिळून आलेल्या आहेत. अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या 146 केसेस असून, त्यापैकी 132 मुली सापडल्याचे यावेळी चाकणकर यांनी सांगितले.


बालविवाह रोखण्याची आकडेवारी असमाधानकारक


दरम्यान बीड जिल्ह्यात 263 नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर असून, त्यातील 60 बंद आहे. 182 सुरु आहेत. जिल्ह्यात गर्भपाताचे प्रमाण अधिक असल्याने सोनोग्राफी तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या आहेत. उद्यापासून कारवाईला सुरुवात होईल, असे चाकणकर म्हणाल्या. तर चालू वर्षात जिल्ह्यात केवळ तीन बाल विवाह झाल्याचे, तर 39  बाल विवाह थांबविल्याची नोंद आहे. ही नोंद असमाधानकारक असल्याचं देखील चाकणकर म्हणाल्या.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Crime News: आधी मोबाईल गिफ्ट दिला, नंतर भेटायला गेला अन् तिथेच गेम झाला