Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात पुन्हा एकदा सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, एका दहावीच्या वर्गातील तरुणाचा प्रेमप्रकरणात हत्या (Murder) करण्यात आली आहे. वैजापूरच्या भिवगाव शिवारात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सचिन प्रभाकर काळे (वय 16 वर्षे) असे या तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे सचिन हा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. 


अधिक माहिती अशी की, मयत सचिन काळे हा विनायक नगर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. दरम्यान त्याचे वर्गातील एका मुलीसोबत प्रेमप्रकरण होते. मात्र कुटुंबातील सदस्यांना याबाबत कोणतेही कल्पना नव्हती. तर सचिन याने आपण प्रेम करत असलेल्या मुलीला काही दिवसांपूर्वी मोबाईल गिफ्ट दिला होता. तर 25 फेब्रुवारीला तो मुलीला भेटण्यासाठी गेला होता. पण तेव्हापासून तो बेपत्ता होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता मुलीच्या वडील, काकासह आजोबाने केलेल्या मारहाणीत या मुलाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. तर या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


दोन्ही हात तोडलेले! 


दरम्यान सचिन काळेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी सचिनचा एक हात तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला होता. तर हिंस्त्र प्राण्यांनी मृतदेहाचे लचके तोडले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला दाखल केल्यावर जवळच एक हेडफोन आणि बूट मिळाले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतेले असून, पुढील तपास करण्यात येत आहे. 


भेटायला गेला अन् तिथेच गेम झाला


सचिनचे आपल्याच वर्गातील एका मुलीवर प्रेम होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने मुलीला मोबाईल घेऊन दिला होता. दरम्यान 25 फेब्रुवारी रोजी तो मुलीला भेटायला गेला होता. पण याची माहिती मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना मिळाली. त्यामुळे मुलीचे वडील, काका आणि आजोबाने सचिनला बेदम मारहाण केली. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात टाकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चार दिवसांनी सचिनचा मृतदेह आढळून आल्यावर हे सर्व प्रकरण समोर आले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! अभ्यासावरुन वडील रागवले, मुलाने उचलले टोकाचे पाऊल, सुसाईड नोटही लिहून ठेवली