बीड : बीडच्या (Beed News ) माजलगावमध्ये दीड महिन्याच्या बाळाला एका खाजगी डॉक्टराने मुदतबाह्य डोस पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आलीय. माजलगाव शहरातील पवार हॉस्पिटलमध्ये दीड महिन्याच्या बाळाला आजी आजोबा डोस देण्यासाठी घेऊन गेले होते. डोस दिल्यानंतर त्याच्यावरील तारीख ही मुदत संपलेली होती त्यामुळे मुदतबाह्य डोस दिल्याने डॉ. शरद पवार यांच्या विरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.
माजलगाव शहरात असलेल्या पवार हॉस्पिटलमध्ये अशोक धारक यांच्या मुलीची प्रसूती दीड महिन्यापूर्वी झाली होती. त्यानंतर अशोक धारक दीड महिन्याच्या चिमुकलीला घेऊन याच पवार हॉस्पिटलमध्ये डोस देण्यासाठी घेऊन आले होते. दीड महिन्यानंतर या बाळाला रोटाव्हायरस आणि न्यूमोकोकल हा डोस देण्यात आलं. ज्या पॉकिटामधून या औषधाच्या बाटल्या बाहेर काढल्या त्यावर अशोक धारक यांना शंका आली असता त्यांनी या बॉक्सचे फोटो काढले आणि डोस देऊन झाल्यानंतर आपल्या नातीला घेऊन ते घरी गेले.
घरी गेल्यानंतर त्यांनी बॉक्सचे फोटो आपल्या मुलीला दाखवल्यानंतर त्यावर मार्च महिन्यातच या डोसची तारीख संपल्याचा निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या मुलीला घेऊन रुग्णालय गाठलं आणि याबद्दल पवार हॉस्पिटलच्या डॉ. शरद पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तारीख संपली असली तरी बाळाला काय होणार नाही असं सांगितलं. मात्र संतप्त झालेल्या अशोक धारक यांनी मुदत संपलेली औषध रुग्णालयात का ठेवली जातात आणि त्याच्यामुळे लहान मुलांच्या जीवाशी खेळ केला जात आहे का यावरून आरोग्य विभागाकडे डॉ. शरद पवार यांची तक्रार केली आहे.
मुंबईत गोवरचा विळखा
लहान मुलांचे वेळेवर लसीकरण न झाल्याने आजारांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण सध्या दिसत आहेत. मुंबईत गोवर या आजाराचा विळखा वाढतोय आणि केंद्र सरकारनंही त्या आजाराची गंभीर दखल घेतली आहे. काही दिवसांआधी गोवंडीत गोवरमुळे तीन बालकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मुंबईत उच्चस्तरीय पथक तैनात करण्यात आलं आहे. मुंबईत जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत गोवरचे 109 रुग्ण आढळले आहेत. मुंबई महापालिकेनं या आजारावर उपाययोजनेला सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून आज मुंबईतील गोवंडी आणि इतर ठिकाणी आढावा घेऊन विशेष अहवाल सादर करण्यात येणार आहे.