बीड: महादेव मुंडे खून प्रकरणात धक्कादायक खुलासे करणारे विजयसिंह बाळा बांगर यांनी आता या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल देखील समोर आणला आहे. बांगर यांनी मुंडे कुटुंबीयांना भेट देत मी तुमच्या न्यायाच्या लढ्यात सोबत असल्याचे सांगितले होते. आता या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 21ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला आणि 22 ऑक्टोबर रोजी रात्री 12.15 ते 1.30 असे सव्वा तास उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते.

Continues below advertisement


आधी महादेव मुंडे यांचा गळा कापला तब्बल 20 से.मी. लांब, 8 से.मी. आणि 3 से.मी. रुंद असा हा वार होता. तर त्याच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले होते. मानेवर वार करताना तो चुकविल्याने तोंडावरील वार झाला होता. तोंडापासून कानापर्यंत एक वार झाला त्याची लांबी 13 से.मी. इतकी होती, तर रुंदी व खोली दीड सेमी होती. महादेव मुंडे यांच्या अंगावर 16 वार असल्याचे या शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. 


महादेव मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्याने त्यांची श्वसन नलिका कापली गेली होती. शिवाय अनेक रक्तवाहिनाही तुटल्या होत्या. दरम्यान महादेव मुंडे यांनी दोन्ही हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या डाव्या आणि उजव्या हातावर अंगठ्याजवळ, तळहातावर आणि मधल्या बोटावर जखमा झाल्या होत्या, खाली पडल्यानंतर डाव्या गुडघ्यालाही खरचटल्याची नोंद आहे. चेहरा छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेली पांढरी बनियन ब्राऊन कलरचा शर्ट होता. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल परळी शहर पोलिसांना दिला होता त्यात अतिरक्तस्राव झाल्याने शॉकमध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.


अंगावर कुठे होते किती वार


- मानेवर उजव्या बाजूला  - 4
- तोंडापासून गालापर्यंत - 1
- उजव्या हातावर - 3
- डाव्या हातावर - 3
- तोंडावर - 1
- नाकावर - 1
- गळ्यावर - 3


महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा घटनाक्रम


* 20 आक्टोबर 2023 च्या संध्याकाळी महादेव मुंडे यांनी 6 वाजता ट्युशनवरुन मुलांना घरी सोडले 
* त्यानंतर पिग्मीचे कलेक्शन केले. गणेश पार हनुमान नगर मोंढा मार्केट शेवटला शिवाजी चौकात 7.10 मिनिटाला सीसीटीव्ही मध्ये दिसले. आझाद चौकात मित्राला भेटले 
* आझाद चौक पासून 300 मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री 9 वाजता आढळून आली.
* ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि याच गाडीवर रक्त देखील सांडलेले होते अशी कुटुंबीयांनी माहिती दिली
 * याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुकसह आणखी काही कागदपत्रं होती 
* ही मोटरसायकल सापडली. मात्र महादेव मुंडे कुठे होते हे माहिती नाही. या मोटरसायकल जवळ दोन चपला सापडल्या. यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती, तर दुसरी कोणाची होती याबाबत माहिती भेटली नाही.
* दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली त्यापासून 50 मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला. मात्र, हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.
* 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांचा महादेव मुंडे यांची मेहुणे सतीश फड यांना फोन आला 
* हा फोन आल्यावर सतीश फड यांनी तात्काळ त्यांच्या दाजींना फोन केला. मात्र तो फोन स्विच ऑफ आला.
 * त्यानंतर सतीश फड यांनी मुंडे यांच्या बँक कॉलनीतील घरी भेट दिली. मुंडे हे तुळजापूरला गेले असल्याचे सांगितले 
* महादेव मुंडे यांचा गळा चिरलेला  होता आणि गळा कापलेला होता 
* त्याचबरोबर हातावर, गालावर, पाठीवर वार करण्यात आले होते
* महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यावर त्यांचा मोबाईल, अंगठी, लॉकेट त्याचबरोबर पिग्मी  कलेक्शनचे साधारण किंमत एक ते दीड लाख रुपये हे गायब होते
* मृतदेहाचे शवविच्छेदन  करून तो मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यात ठेवणार होते. मात्र, पोलिसांनी आम्ही आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करण्यात आला. मात्र अद्याप या प्रकरणातील आरोपी फरार आहेत.