Beed News : बीड (Beed) जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केली. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्यात आलं असून डीवायएसपी सुनील जायभाय यांची अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे बोकाळले असून याच परिसरामध्ये होत असलेल्या गुंडगिरीकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत असा आरोप करत केजच्या (Kaij) भाजपच्या आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वासुदेव मोरे आणि सुनील जायभाय यांच्यावर कारवाईची घोषणा केली.


ग्रामीण ठाण्याच्या प्रमुखपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या सहेतुक दुर्लक्षामुळे सर्वत्र अवैध धंदे फोफावले आहेत. गुटखा, हातभट्टी, बनावट दारुची सर्रास विक्री वाढली. बेकायदेशीर क्लब, जुगारअड्डे राजरोसपणे सुरु असून गुंडांचा हैदोस वाढला आहे. ठाण्यात अवैध धंदेचालक, गुंड यांचा राबता असून त्यांना मोरे यांच्याकडून सन्मान तर सामान्य नागरिकांना मात्र दुय्यम दर्जाची वागणूक मिळू लागली. त्यांच्या काळात गैरप्रकारांवर एकही लक्षणीय कारवाई झाली नाही. याउलट अनेक वादग्रस्त प्रकार त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये घडले आहेत. 


या सोबतच दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर एसीबीने लाचखोरीचे गुन्हे नोंदवले. तसेच, जप्त केलेला गुटख्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन झाले. पोलीस ठाण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेले गैरप्रकार ठाणेप्रमुख मोरे यांना माहिती नसावेत असे शक्य नाही, अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वीसुद्धा अंबाजोगाई परिसरातील लोक करत होते.


बनावट दारुच्या कारखान्यावरील संशयास्पद कारवाई
वासुदेव मोरे यांनी 8 जुलै रोजी वरपगाव शिवारात बनावट दारुच्या कारखान्यावर छापा मारुन साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे दाखवले. मात्र, दुसऱ्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्याच ठिकाणी छापा मारुन सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आदल्या दिवशीच पोलिसांनी छापा मारलेला असताना एक्साईजला पुन्हा मुद्देमाल कसा काय सापडला? मोरे यांनी आदल्या दिवशी फरार दाखवलेला मुख्य आरोपी एक्साईजच्या छाप्यावेळी त्या ठिकाणी होता हे देखील उघड झाले. तसेच, मोरे यांनी जागा मालकाचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचाही आरोप झाला. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबद्दल शंका निर्माण झाली. या सर्व प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचीही चर्चा रंगली. आमदारांच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत मोरे यांच्या विरोधात डिफॉल्ट रिपोर्ट पाठवला. 


नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीवर तात्काळ कार्यवाही..
आमदार नमिता मुंदडा यांनी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय यांच्या आशीर्वादाने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचा बेबंदशाही कारभार सुरु असल्याबाबत लक्षवेधी मांडली. त्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीआय वासुदेव मोरे यांच्याविरोधात डिफॉल्ट रिपोर्ट प्राप्त झाल्याचे नमूद करत त्यांना निलंबित करण्याची आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय यांची अकार्यकारी पदावर बदली करण्याची घोषणा विधानसभेत केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय हे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत.