Beed News : बीड : बीड जिल्ह्यात (Beed) जातीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. वंजारी समाजबहुल 2 गावांनी एक अजब ठराव केला आहे. मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील जातीय संघर्ष शिगेला पोहोचला होता. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. 17 मे या दिवशी सकाळी 10 वाजता मुंढेवाडीमध्ये गावातील मंदिराच्या पारावर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मराठा समाजाच्या दुकानावर जायचं नाही. मराठा समाजाच्या किर्तनकाराला किर्तनाला बोलवायचं नाही. मराठा समाजाच्या बियर बारवर जायचं नाही. चहाच्या हॉटेलवर जायचं नाही. जो हे नियम मोडेल त्याला 5 हजार रूपये दंड ठोठावण्यात येईल, असे निर्णय घेण्यात आले आहेत. यावर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले की, "असं व्हायला नाही पाहिजे, कारण शेवटी आपण गाव-खेड्यात एकत्र राहतो, नांदतो. पण आता वेळ निघून गेली आहे. मराठ्यांचं पूर्ण मतदान घेतलं. आम्ही जातीयवाद कधी केलाच नाही, दाखवून द्या कधी केलाय ते... आम्ही आधी कुणाला बोललोच नाही. आता सुधीर मुनगंटीवार आणि शंभूराजे देसाईंनी पत्रकार परिषद घेतली, ते कधी जातीयवाद करत नाहीत. जर काही गैरसमज झाला असेल तर संवादातून सोडावा. आता त्यांनीच उत्तर द्यावं की, जातीयवाद कोण करतंय? मराठ्यांनी कधीच जातीयवाद केलेला नाही. गोरगरीब मराठ्यांसोबत तुम्ही सत्तेत आल्यानंतर असे वागणार, तुम्ही गोरगरीब मराठ्यांशी असं वागणार?"


"आमचेही वंजारी बांधव आहेत. एक कुजबूज अशीही कानावर येतेय की, ताईंनी आणि भाऊंनीच सांगितलंय की, आता झाली निवडणूक. आता निवडणूक झाल्यावर बघू. आता हे काय, झालं बघायला सुरू... आता मराठ्यांनी काम केलं त्यांच्यासाठी, आता तुमचीच जात भोगायला लागली. म्हणून मराठा समाजाला मी 15 दिवसांपूर्वीच आवाहन केलं होतं की, आपण शांत राहायचं. आपण जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. माझा मराठा समाज कधीच आक्रमक झालेला नाही. सगळे शांततेतंच आहे. आता मराठ्यांना माझं आवाहन आहे की, बाबांनो तुमच्यावरचा अन्याय बंद करायचा असेल तर सत्तेत जावंच लागणार, लोकसभा झाली, पण पुढे विधानसभा आहे, जर तुम्ही आमच्यावरचा अन्याय बंद करणार नसाल तर, मराठ्यांना विचार करावा लागेल.", असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.