बीड : लोकसभा निवडणूक निकालात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत अखेर बजरंग सोनवणेंच्या गळ्यात खासदारकीची माळ पडलीय. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja munde) यांचा 6 हजार मतांनी पराभव झाला. या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण बनलं असून बीड जिल्ह्यातील काही तालुक्यात बंदची हाक देण्यात आली होती. बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थक व बजरंग सोनवणे समर्थकांमध्ये सोशल वॉर रंगल्याचं दिसून आलं. त्यावरुन, दोन्ही गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपू्र्वी पाथर्डी बंदची हाक दिल्यानंतर शिरुरही बंद ठेवण्यात आलं होतं. आज परळी बंद ठेवण्यात आलं आहे. बीडमधील (Beed) या वातावरणावर बोलताना पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. 


बीड जिल्ह्यात आज मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ शिरुर बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी, आयोजित मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर, दुसरीकडे पंकजा मुंडेंबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ आज परळी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे, बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण झाला असून दोन्ही नेत्यांचे समर्थक सोशल मीडियातून एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. दरम्यान, पोलिसांचाही सोशल मीडियावर वॉच असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहेत. 


जिल्ह्यातील तणावपूर्ण शांततेत आज पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना व समर्थकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ''स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे, संयम ठेवत आहे, तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. पराभव मी स्वीकारला आणि पचवला आहे, पराभव तुम्हीही पचवा!! असे आवाहन पंकजा यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तसेच, अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात.. शांत व सकारात्मक रहा please please..


माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. आई बापाला दुःख देऊ नका. त्यांच्या जीवाला घोर लावू नका, तुम्हाला शप्पथ आहे मुंडे साहेबांची... असे ट्विट पंकजा मुंडेंनी केलं आहे. 






चूलबंद आंदोलन, ग्रामस्थांचा ठराव


पंकजा मुंडेंचा पराभव बीड जिल्ह्यातील अनेक जणांना जिव्हारी लागलाय, त्यामुळे केवळ सोशल मीडियावरच नाही तर प्रत्यक्ष बोलताना सुद्धा अनेक लोकांना हा पराभव पचनी पडताना पाहायला मिळत नाही. पंकजा मुंडे यांच्या या पराभवामुळे त्यांचे राजकीय करियर संपुष्टात आल्याचंही काहींना वाटत आहे. म्हणूनच बीड जिल्ह्यातील पांडुळ गव्हाण येथे गावातील सगळ्या नागरिकांनी एकत्रित येत मंदिरात बैठक बोलावली. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं, असा ठरावच ग्रामस्थांनी एकमुखाने मांडला. तर, पांगुळ गव्हाण येथील ग्रामस्थांनी चुलबंद करून अन्नत्याग सुरू केले आहे. पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.