बीड : देशभरात गुरु पौर्णिमेचा (guru purnima) उत्साह असून आपल्या गुरुंप्रती आदर, सेवाभाव आणि गुरुजनांना वंदन करुन कृतज्ञता व्यक्त होत आहे. शाळा, कॉलेज आणि विविध संस्थांमध्ये गुरुंच्या आठवणी, त्यांनी दिलेलं ज्ञान आणि शिकवण सांगत गुरु पौर्णिमा साजरी केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या वृत्तांनी काळ्या यादीत गेलेल्या बीडमधील (Beed) गुरुकूल शिक्षण संस्थेतील गुरु पौर्णिमा निश्चितच काहीशी वेगळी ठरते. बीडमध्ये आदर्श भावी पिढी घडविताना विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची लागवडच येथील संस्थेनं केली आहे. बीडच्या सोनदरा गुरुकुलमध्ये (school) आज अनोखी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. श्री सत्यवृक्ष पूजन आणि एक वर्ष पूर्ण झालेल्या झाडांचा वाढदिवस करून निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांची गुरुपौर्णिमा साजरी झाली. शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा वेगळाच उत्साह या निमित्ताने दिसून आला.
बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोमरी गावातल्या डोंगर रांगेत मागील 40 वर्षांपासून हे गुरुकूल वसलेले आहे. गुरु पौर्णिमा आणि गुरुकुलचा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. याच निमित्ताने यावर्षी सत्यनारायण पूजेच्या धरतीवर श्री सत्यवृक्ष पूजा करण्यात आली. त्यात आयुर्वेदातील मंत्र कथा आणि पूजेची मांडणी करून एक वर्ष जोपासलेल्या झाडांचा वाढदिवस देखील साजरा झाला. विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने गुरु-शिष्याचं नातं जोपासून ही अनोखी गुरुपौर्णिमा साजरी झाल्याने येथील विद्यार्थ्यांना चांगल्या संस्कारांची शिदोरी मिळाली आहे.
रुद्राक्ष रोपाचे पूजन
गुरुकूल परिसरात मागील वर्षी 600 झाडे लावण्यात आली होती, याची जोपासना वर्षभर करण्यात आल्यानंतर आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झाडांचे औक्षण करत वर्षपूर्तीचा वाढदिवस साजरा झाल्याचे गुरुकुलच्या संचालक अश्विन भोंडवे यांनी म्हटलं. विशेष म्हणजे आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त यंदाही पुन्हा वेगवेगळ्या औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आली. कलश पूजन न करता रुद्राक्ष रोप ठेवून त्याची पूजा करण्यात आली. यावेळी, आयुर्वेदातील मंत्र कथा आणि पूजेची अनोखी मांडणी केल्याचं दिसून आलं.
निसर्गाच्या सानिध्यातील थीम
1986 साली या गुरुकुलाची स्थापना करण्यात आली, इतर शाळांपैकी इथे देण्यात येत असलेले शिक्षण थोडे वेगळे आहे. विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांसोबतही शिक्षकांचा संवाद असतो. या ठिकाणचे वर्ग, खुल्या वर्ग रचना न करता विषय रचना करण्यात आल्या आहेत. निसर्गाच्या सानिध्यातील थीम गुरुकूलमध्ये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे, सर्वांगांनी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते, असे गुरुकुल उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. दरम्यान, गुरुकुलमधील निसर्ग सौंदर्य खुलवणारी अनोखी गुरुपौर्णिमा आदर्श ठरत आहे. यातून येणाऱ्या पिढीला एक अनोखा संदेश देण्यात आला आहे.
हेही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI