बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यामध्ये आणलेल्या विकास प्रकल्पाबद्दल परळी तालुक्यातील शिरसाळा येथे त्यांच्या कृतज्ञता सोहळ्याचा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणासह राज्यातील शेतकऱ्यांचा विकास कसा करता येईल यावर भाष्य केले. दरम्यान याचवेळी बोलतांना "ज्या दिवशी मला जात सांगण्याची वेळ येईल त्याच क्षणी राजकारण सोडून देईल”, असे देखील मुंडे म्हणाले. 


पुढे बोलतांना मुंडे म्हणाले की, "सध्या राज्यभरच नाही तर देशभरात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, या मराठा समाजाच्या आंदोलनाची लढाई ही कोण्या एका समाजाविरोधात किंवा नेत्याविरोधात नसायला हवी. मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो, तेव्हा पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये मराठा आरक्षणासाठी मत मांडले होते. तर, विरोधी पक्षनेता असतांना देखील सभागृहामध्ये मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न सर्वात प्रथम मांडले होते. आम्ही देखील मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत. जो समाज मागासलेला आहे, त्या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही माझी भूमिका आहे असं धनंजय मुंडे म्हणाले.


...म्हणून लातूरकरांनी मला जोडे मारले


सोयाबीन प्रक्रिया केंद्र परळीला आणलं म्हणून लातूरकरांनी माझ्या फोटोला जोडे मारले. तर, माझी आई अस्वस्थ अवस्थेत असताना लातूरहून मी तिला रुग्णालयात घेऊन जात असताना, यावेळी देखील माझ्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. मात्र, हे होत असतांना माझ्या जिल्ह्यातला एकही व्यक्ती असं म्हणाला नाही की, धनंजय मुंडे यांनी चांगलं केलं. याचं मला वाईट वाटलं. मात्र, मला जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणि राज्याचा शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहे. त्यामुळे, दिवाळीच्या अगोदर अग्रीम पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असेही मुंडे म्हणाले. 


त्या दिवशी राजकारण सोडून देईल...


पावसाळ्यामध्ये काही छत्र्या उगवत असतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. त्या क्षणिक असतात. माझ्या मातीतल्या माणसाला मोठ करणे हीच माझी जात आणि धर्म आहे. ज्या दिवशी मला राजकारणात जात सांगावी लागेल त्या दिवशी मी राजकारण सोडून देईल. तर, जगाला हेवा वाटावा असा विकास आपल्या माणसांचा करायचा आहे. तर, माझ्यापेक्षा जास्त विकासाचे प्रकल्प कोणी आणत असेल तर त्याची मला काही हरकत नाही. त्यामुळे तुमच्या आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या, असं धनंजय मुंडे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Dhananjay Munde : '...तोपर्यंत मी हारेतुरे स्विकारणार नाही', धनंजय मुंडेंचा होमग्राऊंड बीडमध्ये निर्धार