बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीड (Beed) जिल्ह्यात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील परिस्थितीचा संपूर्ण आढावा जाणून घेतला आहे. दुष्काळामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील त्यांनी केली. तर यावर लवकरच मार्ग काढणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं. तर एक रुपयाच्या पिक विम्याची रक्कम जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला मिळणार नाही तोपर्यंत हारतुरे स्वीकारणार नाही, असं देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं.
तोपर्यंत हारेतुरे स्विकारणार नाही - धनंजय मुंडे
शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी राज्यशासनाने एक रुपयात पिक विमा योजना काढली आहे. ही पिक विमा योजना जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विम्याची रक्कम मिळणार नाही तोपर्यंत कुठलेही स्वागत किंवा हारेतुरे स्विकारणार नसल्याचा संकल्प धनंजय मुंडे यांनी केलाय. तर शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं. तर येत्या काही काळात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
तात्काळ कारवाई करण्याचे आदेश
बीड जिल्ह्यातील काही शासकीय आणि खाजगी जमिनीवरील बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले. इतकेच नव्हे तर अनेकांनी एक रुपयात पिक विम्याचा अर्ज भरला असल्याची बाब देखील उघडकीस आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत.
दोन दिवसांपूर्वी बीडच्या नगरपालिकेची जागा गायरान जमीन दाखवून त्यावर तेलंगणातील एका व्यक्तीने पिक विमा भरला होता. तर दुसरीकडे माजलगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 94 एकर जमिनीवर कळंब तालुक्यातील एका व्यक्तीने पिक विमा भरल्याचं उघड झालंय. त्यामुळे या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश धनंजय मुंडे यांनी दिलेत.
'म्हणून ते म्हणतायत आम्ही पक्ष चोरला'
'त्यांच्याकडे बहुमत नाही म्हणून ते म्हणतात आम्ही राष्ट्रवादी पक्ष चोरला' असं म्हणत धनंजय मुंडे यांनी जयंत पाटलांना उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा वाद सध्या निवडणूक आयोगात सुरू आहे. 'लोकशाहीमध्ये कोणालाही पक्ष चोरता येत नाही त्यांच्याकडे बहुमत नसल्याने ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत', असं धनंजय मुंडे म्हणालेत.