Dhananjay Munde : "मंत्री असल्याने मुंबईत राहावं लागायचं. बैठका घ्याव्या लागायच्या त्यामुळे तुमच्यात राहता येत नव्हतं. आता आपलं सगळ्यांसारखंच आहे. आता जमिनीवर आल्यासारखं वाटतंय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (15 जुलै) बीड जिल्ह्यातील परळीमध्ये त्यांच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपण मंत्री नसल्याचा जास्त आनंद होत असल्याचं मिश्किल भाष्य केलं आहे.
"मंत्री म्हणून जर कोणाला आनंद होत असेल तर धनंजय मुंडे म्हणून मला होत आहे. कारण मंत्री असताना तीन चार दिवस मुंबईत राहावं लागायचं. मीटिंग घ्याव्या लागायच्या. जमिनीवरुन फूटभर वर मंत्री झाल्यावर वाटायचं की मी फूटभर वर आहे. जवळचे लोक पण बोलायचे असे तू मंत्री झालास मग माझं काय? मला आनंद आहे की मीच मंत्री नाही, तुझं जसं आहे तसंच माझं आहे. पण या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे," असं धनंजय मुंडे म्हणाले.
सत्ता असो नसो विकासाचा निधी कमी पडू देणार नाही : धनंजय मुंडे
"आपण सत्तेत नसताना आपला निधी रोखण्याचं काम काहींनी केलं. इथले लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सत्तेत होते तरी देखील ते आपला निधी रोखू शकले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होतं, उपमुख्यमंत्री कोण होतं याचं आपल्याशी देणं घेणं नाही. सत्ता असो नसो विकासाचा निधी कमी पडू देणार नाही, असं यानिमित्ताने मी वचन देतो, असं धनजंय मुंडे म्हणाले. "पुढच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात परळी मतदारसंघाचं कर्तृत्व एवढं मोठं असणार आहे की परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय राज्यात कुठलीही मोठी राजकीय घडामोड घडणार नाही," असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या