Dhananjay Munde : राज्यातील 92 नगर परिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) राज्य निवडणुक आयोगाने घोषित केल्या असल्याने या निवडणुका ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होत असल्या व राजकीय आरक्षणाचा निर्णय जो काही येईल तो येईल, मात्र आम्ही परळी नगर परिषद (Parli Nagarpalika) निवडणुकीत ओबीसी (OBC reservation) उमेदवारांना 27% जागा  देणार असल्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जाहीर केले आहे. 


दोनच दिवसांपूर्वी राज्यातील 92 नगर परिषदा व 4 नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. याच दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने समन्वय साधून तात्काळ मार्गी लावावा व त्यानंतरच राज्यात निवडणुका घ्याव्यात अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली होती.  धनंजय मुंडे यांनी ट्वीट करतही याबाबतची माहिती दिली. 






मात्र राजकीय प्रवाहात ओबीसींचे स्थानिक इच्छुक उमेदवार यांच्यावर अन्याय होणार नाही, याचा विचार करून, आरक्षणाचा निकाल जो येईल व जेव्हा येईल तेव्हा बघून घेऊ मात्र आम्ही परळी नगर परिषद निवडणुकीत 27% जागा ओबीसी उमेदवारांना देणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली आहे.  धनंजय मुंडे हे परळीचे आमदार असून परळी नगर परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली मागील 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने परळीत 32 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. 


निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा व 4 नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षासह सर्वांनीच याला विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निवडणूका होणार का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.