Continues below advertisement

बीड : मराठवाड्यातील बीडमध्ये आज रेल्वे नाही तर विकासाची वाहिनी पोहोचली आहे, त्या माध्यमातून विकासकामांना वेग मिळेल. बीडमध्ये सुरू झालेली ही रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण करतो असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बीड ते अहिल्यानगर अशी रेल्वे सुरू झाली असून त्या गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवला.

आज सरकार सर्व परीने आपल्या पाठीशी आहे. मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांना आवश्यक निधी देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. आजचा दिवस हा श्रेयवादाचा नाही. बीडमध्ये रेल्वे सुरु होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. हा जगन्नाथाचा रथ आहे, अनेकांचा हात या कामासाठी लागला.

Continues below advertisement

बीडची रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ज्यांनी आम्हाला दिशा दाखवली त्या गोपीनाथ मुंडेना मी वंदन करतो. आज बीडच्या जनतेच्या स्वप्नपूर्तीचा योग आहे. केशरकाकू क्षीरसागर, गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वेचे स्वप्न बघितलं. पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं, आम्ही गोपीनाथराव मुंडे यांना ही रेल्वे अर्पण करत आहोत. रेल्वे संघर्ष समितीचेदेखील मी अभिनंदन करतो. या रेल्वेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे."

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "रेल्वे प्रकल्पात जमीन अधिग्रहण अवघड काम होतं. सगळ्या प्रकल्पामध्ये 50 टक्के सहभाग राज्य घेईल अस पत्रं आम्ही केंद्र सरकारला दिले. या आधीच्या सरकारने मराठवाड्याच्या रेल्वेसाठी फक्त 400 कोटी रुपये दिले होते. पण गेल्या 10 वर्षांत मराठवाड्यासाठी 21 हजार कोटी रुपये दिले."

पुढच्या पीढीला दुष्काळ बघू देणार नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मराठवाड्याच्या पुढच्या पीढीला दुष्काळ बघू देणार नाही. कोल्हापूर-सांगलीमध्ये जो पूर येतो ते पाणी उजनीला आणणार आणि तिथून ते पाणी मराठवाड्यात आणणार. वेगवेगळ्या माध्यमातून मराठवाड्यातील दुष्काळ संपवणार. त्यासंबंधी हे सरकार काम करत आहे."

बीडमध्ये पहिली रेल्वे सुरू

बीड जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीड शहरात प्रथमच रेल्वे धावत आहे. यामुळे केवळ बीडकरांमध्येच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यात उत्साहाचे वातावरण आहे. अहिल्यानगर ते बीड मार्गावर आजपासून पहिली रेल्वे धावणार आहे. या रेल्वे मार्गामुळे बीडचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास नव्या उंचीवर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Beed To Ahilyanagar Railway Timetable : बीड ते अहिल्यानगर रेल्वेचे वेळापत्रक

सध्या ताशी 30 किलोमीटर वेगाने ही रेल्वे धावणार असून बीड ते अहिल्यानगर प्रवासाला 5.30 तास वेळ लागणार आहे. अहिल्यानगरहून सकाळी 6.55 वाजता गाडी सुटणार असून ती बीडला दुपारी 12.30 वाजता पोहचणार आहे. बीडवरून दुपारी 1 वाजता गाडी सुटणार असून ती अहिल्यानगरला संध्याकाळी 6.30 वाजता पोहचणार आहे.

आठवड्यातून सहा दिवस ही गाडी धावणार असून रविवारी सुट्टी असेल. बीड ते अहिल्यानगर प्रवासास 40 रुपये इतके तिकीट दर असेल. सध्या ही गाडी डिझेलवर चालणार असून कालांतराने विजेवर धावणार आहे.

Beed To Ahilyanagar Railway Stations : किती स्थानके असतील? 

बीड ते अहिल्यानग असा 167 किमीचे अंतर ही रेल्वे कापणार आहे. त्यामध्ये बीडसह एकूण 15 स्थानकांचा समावेश आहे.

  • बीड
  • रायमोह
  • रायमोहा
  • विघनवाडी
  • जाटनांदूर
  • अळमनेर
  • हतोला
  • वेताळवाडी
  • न्यू आष्टी
  • कडा
  • न्यू धानोरा
  • सोलापूरवाडी
  • न्यू लोणी
  • नारायणडोहो
  • अहिल्यानगर

ही बातमी वाचा: