बीड: जिल्ह्यातील परळी येथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीडच्या एमआयडीसीमध्ये कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. 'कोकणात 'कोका-कोला' दिली, आम्हाला फॅन्टा तरी द्या' असे म्हणत मुंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आपली मागणी मांडली आहे. 


दरम्यान यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, "आज दोन मागण्या करतोय. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. प्रसाद योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र परळीचा विकास व्हावा. हात जोडून याबाबत प्रार्थना करतो. तीन ऊर्जाशक्तीपीठ म्हणून परळीच्या वैद्यनाथाचे स्थान आहे. एमआयडीसीची कमी होती ती देखील दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, कोकणात तुम्ही कोका-कोला नेला, आम्हाला फॅन्टा तरी आमच्या एमआयडीसीमध्ये द्यावेत, असे धनंजय मुंडे म्हणाले.  


पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र... 


अनेकजण म्हणाले की, आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण काय आहे. आजच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मी आणि पंकजा मुंडे एकत्र आहोत. अजित पवार आणिदेवेंद्र फडणवीस एकत्र आहे. बाळा काका आणि सुरेश अण्णा एकत्र आहे. हे सर्व पाहिल्यावर मुख्यमंत्री साहेब तुम्ही खरेच एकनाथ असून, एकनाथामुळे एक्की निर्माण होत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 


पंकजा मुंडे- देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर


शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्ताने पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस देखील एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून, या कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे उपस्थित होत्या. याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पाहायाले मिळाले. विशेष म्हणजे, मागील वर्षभरात यापूर्वी दोन वेळा देवेंद्र फडणवीस हे बीडला आले. मात्र दोन्हीवेळी पंकजा मुंडे अथवा भाजप खासदार प्रीतम मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर गेल्या नव्हत्या. मात्र, आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि अजित पवार आले असताना पंकजा मुंडे सुद्धा या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. 


दीड हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे आज बीडच्या परळीतील शासन आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. यावेळी, सुमारे दीड हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ करण्यात आले. अनेक पूर्ण कामांचे लोकार्पण देखील करण्यात आले. सोबतच, विविध शासकीय योजनांच्या जिल्ह्यातील सुमारे 22 हजार लाभार्थींना थेट लाभाचे वितरण करण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


पंकजा मुंडे- देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर; मुंडेंनी यापूर्वी दोनदा टाळले होते फडणवीसांसोबतचे व्यासपीठ