बीड : ओबीसी महाएल्गार सभेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे, त्यांनी सावध राहावं, ही मंडळी तुमच्या वाईटावर आहेत, असं म्हटलं. त्यांचे टार्गेट ओबीसी नाही देवेंद्र फडणवीस आहेत, असंही छगन भुजबळ म्हणाले. या ओबीसी महाएल्गार सभेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
Chhagan Bhujbal alert to Devendra Fadnavis : त्यांचं टार्गेट ओबीसी नव्हे देवेंद्र फडणवीस : छगन भुजबळ
छगन भुजबळ पुढे म्हणाले, मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत, हे हायकोर्टाचे निर्णय आहेत. अरे तुम्ही कसं काय देता. सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलं की मराठा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, त्यांना आरक्षण देता येणार नाही. मग तुम्ही कसं काय देता. त्यावेळी मुख्यमंत्री कुठं होतं, मुख्यमंत्री नागपूरला होते, इथं यांनी निर्णय घेतला. पात्र शब्द काढून टाकला. मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे, सावधान, ही जी मंडळी आहेत ना तुमच्या वाईटावर आलेली आहेत. तुम्हाला अडचणी निर्माण करणारी आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाही, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवा, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
भाजपच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर 125-135 आमदार मिळाले आहेत. त्या ओबीसीवर अन्याय कराल तर ओबीसी आज दूधखुळे राहिलेले नाहीत. त्यामुळं यामध्ये लवकरात लवकर मार्ग काढावा लागेल, असं छगन भुजबळ यांनी भाजप नेत्यांना सांगितलं.
विजय वडेट्टीवार अंबडला आले होते, त्यांनी सांगितलं पक्ष वगैरे बाजूला पिवळा झेंडा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत, लढणार आहोत. हिंगोलीच्या रॅलीला बोलावलं, काय माहिती प्रेशर आलं, येतो म्हणले आलेच नाहीत. नगरला बोलावलं , पंढरपूरला बोलावलं, बीडला रॅली झाली, आलेच नाहीत. तुम्ही ओबीसी सोबत राहणार असं म्हटलं होतं का आला नाहीत, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. यावेळी भुजबळ यांनी विजय वडेट्टीवारांचा एक व्हिडिओ दाखवला. ज्यामध्ये मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या असं सांगत असल्याचं पाहायला मिळतं. यावर छगन भुजबळ यांनी वडेट्टीवार यांना एकच भूमिका घ्या असं सांगितलं. तासा तासाला तुम्ही जर बदलायला लागला तर ओबीसी समाजाचा घात होईल, असं छगन भुजबळ म्हणाले. आम्ही पक्षासाठी काम करत नाही, आम्ही ओबीसीसाठी काम करतो. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो गेलो नाही, असं देखील भुजबळ म्हणाले.