Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला मागितलेली खंडणी हा महत्वाचा टप्पा. हत्येतील एका आरोपीच्या फोनवरुन वाल्मिक कराडने आवादाला खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तक्रारीत खंडणी मागितल्याची जी तारीख दिली आहे त्याच तारखेचं एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होतंय. या सीसीटीव्हीत वाल्मिक कराड केजमध्ये मकोकातील आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यासोबत दिसतोय. या सीसीटीव्ही फुटेजचा सध्या सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत किती फायदा होईल माहिती नाही. पण या व्हिडीओचा आता नव्या राजकीय आरोप प्रत्यारोपासाठी वापर सुरु झाल्याचं दिसतंय.
व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संतोष देशमुख हत्येचा आरोप असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि मकोका लागलेला वाल्मिक कराड दिसतोय. ही सगळी मंडळी केजमधील विष्णू चाटेच्या कार्यालयात जमताना दिसत आहेत. काही मिनिटांनंतर सध्या निलंबित असलेला पीएसआय राजेश पाटील हा सुद्धा इथे येताना दिसत आहे. या क्लिपनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी पीएसआय पाटील यालाही सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.
खंडणीच्या तक्रारी दिवशीच आरोपींची बैठक
ज्या दिवशीचा हा व्हिडीओ आहे ती 29 नोव्हेंबर तारीख आहे. त्याच दिवशी खंडणी मागितल्याची तक्रार आवादा कंपनीने नोंदवली होती. विष्णू चाटेच्या फोनवरुन वाल्मिक कराड याने खंडणी मागितल्याचं या तक्रारीत म्हटलं होतं. त्या दिवशी वाल्मिक कराड आणि इतर आरोपी एकत्र दिसत असल्यानं विरोधकांनी या योगायोगावर शंका उपस्थित केली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना आमदार जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय की, "आता यापेक्षा मोठा काय पुरावा हवाय तुम्हाला? पोलीस, वाल्मिक कराड आणि खुनातील सर्व आरोपी सर्व एकत्र दिसत आहेत. तरी देखील सरकार म्हणतं असेल की आम्हाला पुरावेच सापडत नाहीत तर काय करायचं? या सर्व गुन्ह्यांमध्ये राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस अधिकारी आहे त्याला आरोपी करा. मास्टर माईंड आणि मास्टर माईंडचा गेम सेट करणारा हा राजेश पाटील आहे."
दरम्यान, वाल्मिक कराडच्या पुण्यातील मालमत्ता प्रकरणी भाजपचे नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडीने चौकशी केली होती. निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया दत्ता खाडे यांनी दिली. तर एखाद्या व्यक्तीच्या एवढ्या मालमत्ता दिसून येत असतील तर कारवाई का नाही असा प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा सुद्धा त्यांनी मागितला.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "विरोधी पक्षातील कोणी असते तर ईडी ची किती तात्काळ कारवाई झाली असती. सत्ताधाऱ्यांच्या अभयामुळे हे झाकले आहे का? धनंजय मुंडे यांचे सातत्याने नाव येत आहे. नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे."
हे सगळं कमी होतं की काय म्हणून सुरेश धस यांनी आणखी दोन नवे धक्के दिले. दीड वर्षांपूर्वी परळीत महादेव मुंडेची हत्या कोणी केली अशी विचारणा त्यांनी केली. सोबतच 1999 सालच्या चेतना कळसे मृत्यूची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
वाल्मिक कराडच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. त्या आधी वाल्मिक कराड आणि मकोकातील इतर आरोपींचं एकत्रित फुटेज व्हायरल होणं हा योगायोग नाही असंही म्हटलं जातंय. या व्हिडीओने न्यायालयात ठोस काही सिद्ध करता येणार नसले तरी सामान्य जनतेच्या मनात शंका उत्पन्न होण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा ठरतोय.
ही बातमी वाचा :