Beed Crime News: बीड: बीड (Beed) तालुक्यातील शिक्षकाने मोबाईलवर स्टेटस ठेवून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. अंथरवणपिंप्री तांडा येथील खाजगी संस्थेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. खाजगी संस्थेत शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या अंकुश पवार (वय 33) यांनी बुधवारी (6 सप्टेंबर) सकाळी आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवून आत्महत्या केली. काही जण धमकी देत असल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.


आत्महत्येपूर्वी मोबाईलवर नेमका काय स्टेटस ठेवला?


अंकुश पवार यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलवर स्टेटस ठेवत कारण स्पष्ट केलं होतं. या स्टेटसच्या आशयात त्यांनी म्हटलं, "पाच जण मला काही दिवसांपासून ब्लॅकमेल करत असून दहा लाख रुपयांची मागणी करत आहेत, यापूर्वी मी त्यांना पाच लाख रुपये दिले आहेत. तरीही आता या पाच जणांकडून पैसे न दिल्यास माझ्या कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे." शिक्षकाचा स्टेटस पाहून अनेक जणांना धक्का बसला.


शेतात गळफास घेतल्याचं समोर


आत्महत्येच्या या प्रकरणानंतर कुटुंबीयांनी अंकुश पवार यांची शोधाशोध सुरू केली. त्यानंतर बीड शहराजवळ असलेल्या एका शेतामध्ये अंकुश पवार हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले, त्यानंतर त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.


तीन दिवसांपूर्वी उंची कमी असल्याने एका तरुणीचीही आत्महत्या


परीक्षेचा तणाव, आर्थिक तणाव, घरगुती वाद अशा अनेक कारणांनी आत्महत्या केल्याच्या घटना रोज कुठे ना कुठे समोर येत असतात. मात्र औरंगाबादमधून तीन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली. कमी उंचीचा सतत विचार करुन तणावाखाली गेलेल्या एका 23 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. सोमवारी (4 सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक चौकशीत,या तरुणीने उंचीच्या तणावातूनच हे पाऊल उचलल्याचा अंदाज कुटुंबाने पोलिसांकडे व्यक्त केला. अर्चना विजयकुमार यादव (वय 23 वर्षे) असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूळ उत्तर प्रदेशचे असलेले यादव कुटुंब 20 वर्षांपासून औरंगाबाद शहरातील साताऱ्यात वास्तव्यास आहेत. तर, अर्चनाचे वडील विजयकुमार यांचा फरशीचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे. सोमवारी अर्चना आईसोबत घरीच होती. रात्री आठ वाजता अर्चना खोलीत गेली. साडेआठ वाजण्याच्या सुमारास आईने हाका मारुनही खोलीतून प्रतिसाद येत नसल्याने आईने खोलीकडे धाव घेतली. तेव्हा अर्चना गळाफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस अंमलदार विष्णू जगदाळे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्चनाचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :