Beed Kute Tirumala Group : बीड मधील ज्ञानराधा पतसंस्थेचे (Dnyanradha Multistate Co Operative Credit Society) अध्यक्ष सुरेश कुटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरेश कुटे यांच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली असून जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात सुरेश कुटे यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. कुटे यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


शेकडो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ज्ञानराधा पतसंस्थेत (Dnyanradha Multistate Co Operative Credit Society Beed) मागील अनेक दिवसांपासून अडकून पडल्या आहेत. या ठेवी ठेवीदारांना मिळत नसल्याने ठेवीदारांकडून पोलीस ठाण्यात आणि न्यायालयात धाव घेण्यात आली होती. दरम्यान, सुरेश कुटे यांना याप्रकरणी न्यायालयात हजर केले असता शिवाजीनगर पोलिसांनी चौकशीसाठी आणि तपासणीसाठी कुटे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर बीड न्यायालयाने कुटे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर कुटे यांचे सहकारी अशिश पाटोदकर यांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.


तिरुमला ग्रुपवर आयकर विभागाच्या धाडी 


बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने 10 ऑक्टोबर 2023 रोजी धाडी (Income Tax raid On Tirumala Group) टाकल्या होत्या. तिरूमला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्या होत्या. बीड, पुणे, सोलापूर, फलटण, औंगाबादमधील तिरूमला उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने कारवाई करत अनेक कागदपत्रे जप्त केली होती.  


सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांचा गेल्या वर्षी भाजप प्रवेश


महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला (Tirumala) उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. खाद्यतेल, दुग्ध जन्य पदार्थ , हेअर ऑईल , वाहनांचे सुटे पार्ट ,पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो.


उद्योजक सुरेश कुटे हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ आहे. उद्योग क्षेत्रातून त्यांनी जगभरामध्ये बीड जिल्ह्याचे नावलौकिक केलं. 'द कुटे ग्रुप'मुळे बीड जिल्ह्यात बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांच्या पुढाकारानं महिलांना नोकऱ्यांची संधी निर्माण करून दिली आहे. 


ही बातमी वाचा: