बीड : पोलीस भरतीच्या (Police Bharti 2024) उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन (Stimulant Injection) सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 जूनपासून राज्यात मोठी पोलीस भरती (Police Bharti) सुरू झाली आहे. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील 17 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यादरम्यान, बीडमधील पोलिस भरतीवेळी उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य सापडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.


उमेदवार पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू 


बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळून आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत, संबंधित उमेदवाराला ताब्यात घेतले आहे. आता या इंजेक्शनची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिला आहे.  इंजेक्शनची करण्यासाठी अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सॅम्पल घेण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. उमेदवाराकडे आढळलेल्या इंजेक्शनचे सॅम्पल मुंबई येथे प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत. दरम्यान, बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान अशी घटना घडल्याने आता पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी उमेदवारांच्या बॅगांची देखील आता कसून तपासणी केली जाणार आहे. 


टर्मिन इंजेक्शन असल्याचा संशय


पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे व्यायाम करताना कुठलाही थकवा येऊ नये, यासाठी मीफेट्रामाईन घटक असलेले 'टर्मिन' नावाचे इंजेक्शन (Termin Injection) घेतले जाते. पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे सापडलेले इंजेक्शन तेच असावे, असा अंदाज आता अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. इंजेक्शन तपासणीसाठी पाठवण्यात आल्याने प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबाबत अधिकृत माहिती मिळू शकणार आहे.