बीड: बीडमध्ये ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. गटातटाच्या वादातून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळला असून ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं त्या म्हणाल्या. 


सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. त्यातून त्यांनी अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला. दरम्यान, शिवसेने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. त्यानंतर हे सर्व प्रकरण घडल्याचं समोर आलं आहे. 


सुषमा अंधारे या कार्यकर्त्याकडून ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला. तर महाप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर, या यात्रेला गालबोट लागावं म्हणून शिंदे गटाने ही स्क्रिप्ट रचल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. 


स्टेज पाहण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद 


महाप्रबोधन सभेच्या स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर गणेश वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांची काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओची काच फोडल्याची घटना घडली. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी शिवसैनिकांसोबत आल्या होत्या.


ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा बीड शहरात 20 मे रोजी होत आहे. येथील पारस नगरीत सभा स्टेजची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आल्या होत्या. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्याचवेळी पाठीमागे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शाब्दीक बाचाबाची झाली. यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्कीचा ही प्रकार घडला. त्यानंतर उपस्थितांनी सोडवासोडवी केली. मात्र अचानक गणेश वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांच्या उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीवर लाकडी फळी भिरकावली. त्यात जाधव यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे


बीडमध्ये घडलेल्या या घटनेनंतर जिल्ह्यातील ठाकरे गटातील वाद मात्र चव्हाट्यावर आल्याचं दिसून येतंय. त्यातून सुषमा अंधारे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुषमा अंधारे यांनी हा आरोप फेटाळला आहे. 


ही बातमी वाचा: