बीड : मस्साजोग प्रकरणात नवनवे खळबळजनक दावे आणि सनसनाटी आरोपांचा सिलसिला आजही सुरुच आहे. संतोष देशमुखांचं चारित्र्यहनन करण्याचा बनाव पोलिसांनी रचला होता असा आरोप मस्साजोग ग्रामस्थांनी केला. देशमुखांची हत्या अनैतिक संबंधांतून झाल्यांचं दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता असा दावा देशमुख कुटुंबीयांनी केला. खासदार सुप्रिया सुळे आपल्या पथकासोबत 72 दिवसांनंतर मस्साजोगला पोहोचल्या होत्या. त्यांच्यासमोरच हे गंभीर, सनसनाटी आरोप करण्यात आले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आधीच वर्दीवर शिंतोडे उडालेल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. देशमुख कुटुंबीयांना भेटायला गेलेल्या सुप्रिया सुळेंसमोर मस्साजोगच्या गावकऱ्यांनी धक्कादायक दावा केला. देशमुखांची हत्या अनैतिक संबंधांतून झाल्यांचं दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता असा खळबळजनक आरोप देशमुखांचे कुटुंबीय आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केला.
काय आहे ग्रामस्थांचा दावा?
1. संतोष देशमुखांचा मृतदेह घेऊन जाणारी गाडी केज ऐवजी कळंबच्या दिशेने नेली.2. तिकडे एक महिला तयार ठेवली होती.3. त्या महिलेशी देशमुख यांच्याशी संबंध असल्याचा बनाव रचला होता.4. त्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाली असं पोलिसांना दाखवायचं होतं.
संतोष देशमुखांच्या हत्येचा 72 दिवसांनंतर हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. धनंजय देशमुख म्हणाले की, "संतोष अण्णा जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात नेत आहोत असा मला फोन आला होता. ती गाडी कळंबच्या दिशेने चालली होती. केजमध्ये रुग्णालय असताना गाडी कळंबच्या दिशेने का निघाली होती? हा किस्सा मला घरच्यांनी सांगितला."
गावकरी आणि धनंजय देशमुख ज्या गाडीचा उल्लेख करतायत, त्या गाडीच्या मार्गावर चिंचोली फाट्यावर एबीपी माझा पोहोचलं. संतोष देशमुख यांचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पोलिस गाडीच्या पाठीमागे एक कार होती. या कारमध्ये होते आसाराम देशमुख. या सगळ्या घटनाक्रमाचे ते साक्षीदार आहेत.
आज सुप्रिया सुळेंसमोर ग्रामस्थ बोलत असले तरी आपण ही माहिती आधीच दिली होती असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला. ते म्हणाले की, "गावकऱ्यांनी जो आरोप केला आहे त्याची माहिती मी आधीच दिली आहे. कळंब येथे संतोष देशमुखला न्यायचं. त्या ठिकाणी आरोपींनी एक महिला तयार ठेवली होती. मात्र संतोष देशमुखचा अंत त्याआधीच झाला. त्यामुळे बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही. हेच गावकऱ्यांना सांगायचं होतं."
मस्साजोग ग्रामस्थांचा कोणत्या पोलिसांवर काय आरोप?
- पीएसआय राजेश पाटील आणि पोलिस निरीक्षक प्रशांत महाजनांवर आरोपींशी संबंध असल्याचा मस्साजोगकरांचा आरोप आहे.
- सरपंच हत्येतील आरोपींसोबत फिरताना पीएसआय राजेश पाटलांचा सीसीटीव्ही समोर आला.
- पीएसआय राजेश पाटील निलंबित तर पोलिस निरीक्षक प्रशांत महाजनची बीड मुख्यालय कंट्रोल रुममध्ये बदली झाली.
- तपासात निष्काळजीपणा, दिरंगाईचा आरोप आहे.
- तसंच आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप करण्यात आलाय.
पोलिसांबद्दलच्या मस्साजोगकरांचा या सगळ्या रागाचा विस्फोट सुप्रिया सुळेंच्या समोर झाला. केजमधील पोलिस अधिकारी कधी धनंजय देशमुख यांच्या सोबत सीसीटीव्हीमध्ये दिसले तर कधी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांसोबत. कधी बीड पोलिसांचं वाल्मिक कराडसोबतचं संभाषण व्हायरल झालं. आता तर मृत संतोष देशमुखांची बदनामी करण्यासाठी बनाव रचल्याचा गंभीर आरोप पोलिसांवर केला जात आहे. खाकी वर्दीवरचे शिंतोडे पुसण्यासाठी पोलिस काय उत्तर देणार हे पाहावं लागेल.
ही बातमी वाचा: