मुंबई : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना बदनाम करण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. त्यासाठी कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवण्यात आली होती. पण त्या आधीच जीव गेल्याने आरोपींचा प्लॅन अयशस्वी झाल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सांगितलं. विधानसभेत आपण पहिल्या दिवशीच ही गोष्ट सांगितली होती असंही ते म्हणाले. संतोष देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा प्लॅन पोलिसांचा होता असा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीयांनी केला. त्याच आरोपांचा पुनरुच्चार सुरेश धसांनी केला.

संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्येची चौकशी करा, बीडमधील राखेची अवैध वाहतूक आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे. मुंबईतील पोलिसांच्या विशेष पथकामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. 

बीड पोलिसांची महासंचालकांकडे तक्रार

काही निवडक पोलिस अधिकारी अनेक वर्षे बीडमध्ये कार्यरत आहे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार होत असून गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप धस यांनी केला आहे. पोलिस अधिकारी गणेश मुंडेची एसीबी चौकशी सुरू असतानाही त्याला क्रीम पोस्टवर कोणी आणले याची चौकशी करण्यात यावी. बीडमध्ये एकाच ठिकाणी काही पोलिस हे 15-20 वर्षे कसे कार्यरत आहेत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरेश धसांनी रश्मी शुक्ला यांच्याकडे केली. 

देशमुखांच्या बदनामीचा प्लॅन असा ठरला होता

सुरेश धस म्हणाले की, संतोष देशमुखांना उचलून कळंबला न्यायचं होतं. आरोपींनी कळंबमध्ये एक महिला तयार ठेवली होती. तिच्यासोबत काहीतरी झटापट झाल्याचं दाखवायचं होतं. त्यानंतर या प्रकरणात संतोष देशमुखांना मारलं असं दाखवायचं होतं. पण त्या आधीच संतोष देशमुखांचा जीव गेला. त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्लॅन अयशस्वी झाला. 

कृषी विभागात मोठा घोटाळा झाला आहे. त्यासंबंधी राज्यातील शेतकऱ्यांना फसवण्यात आलं आहे. या प्रकरणी 20 फेब्रुवारी रोजी पर्दाफाश करणार आहे. 

माझ्यावर संशय घ्यायची गरज नाही

या प्रकरणात ज्यांच्यावर संशयाची सुई जाते त्या धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याच्या कारणावरून सुरेश धसांवर आरोप केले जात आहेत. त्यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, " आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावले होते. आमची 20 ते 30 मिनिटे आमच्यात चर्चा झाली. ही वेळ रात्रीची 9.30 वाजताची होती. त्यावेळीच सांगितलं होतं की हे प्रकरण मिटणार नाही. त्यानंतर मी त्या बैठकीतून उठून गेलो. फक्त बावनकुळे यांनी बोलण्याच्या ओघात साडे चार तास चर्चा झाल्याचं बोलले. ते तसे का बोलले हे त्यांनाच विचारावं. दुसऱ्यांदा भेटलो ते त्यांच्या आजारीपणाच्या वेळी. ते देखील माणुसकीच्या नात्याने भेटलो.या प्रकरणात माझ्यावर संशय घेण्याचा काही गरज नाही."

ज्याने बदनाम केलं त्याची तक्रार करणार

या प्रकरणात आपल्याला जाणून बुजून बदनाम केलं जातंय. हे ज्याने केलंय त्या बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असं सुरेश धस म्हणाले. 

मस्साजोगची लढाई ही शेवटपर्यंत लढण्याची माझी तयारी आहे. मस्साजोगचे लोक काय म्हणतात, धनंजय देशमुख काय म्हणतात हे पाहा. त्यांचा आपल्यावर विश्वास आहे, आपण तसं काही करणार नाही हे नक्की असं सुरेश धस म्हणाले. 

 

ही बातमी वाचा: