Beed Parli Firing : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत रात्री गोळीबार (Firing) झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यामध्ये मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) यांचा मृत्यू झाला होता. तर दोन जण गंभीर झाले होते. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाचा उलगडा झाला असून या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते (Baban Gite) यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


घरी बोलावून झाडली डोक्यात गोळी 


या सर्व आरोपींनी बापूराव आंधळे व ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवले होते. त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का? असे म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली. बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गीते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली. महादेव गीते याने ग्यानबा गीते यांना गोळी मारली. परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले. दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.


नेमकं प्रकरण काय? 


परळीमध्ये रात्री झालेल्या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते जखमी आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. मृत झालेले बाबुराव आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत आहेत. त्यासोबतच जखमी झालेले ज्ञानबा गीते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत तर तिसरे जखमी महादेव गीते हे बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांचे समर्थक आहेत. आता बाबुराव आंधळे यांच्या खुनाचा उलगडा झाला आहे.