Beed News Update : बीडच्या केज तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक वादातून त्यांच्या सख्ख्या भावानेच कार्यालयात घुसून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  मधुकर वाघ असे हल्ला करणाऱ्या भावाचे नाव आहे. मधुकर याने कोयत्याने आशा यांच्या मानेवर आणि डोक्यात वार केले आहेत. या हल्ल्यात नायब तहसीलदार आशा वाघ या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर जखमी झालेल्या आशा वाघ यांना अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु, त्यांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 


केज येथील महसूल विभागात कार्यरत असलेल्या  नायब तहसीलदार आशा वाघ आणि त्यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या कारणावरून वाद सुरू आहे. मधुकर हा आज सकाळी साडे अकराच्या सुमारास आशा वाघ यांच्या केज येथील कार्यालयात आला होता. यावेळी आशा वाघ आपल्या कक्षात नियमित काम करत होत्या. या ठिकाणीच त्यांच्या दोघांमध्ये बोलण्यातून वाद झाला. याच वादातून मधुकर याने आशा वाघ यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. यात त्यांच्या मानेवर आणि डोक्यावर वार झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. 


हल्ल्यात रक्त बंबाळ झालेल्या अशा यांनी मधूकर याच्या तावडीतून आपली सुटका करून कक्षाच्या बाहेर धाव घेतली. हा प्रकार तहसील कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी मधुकर याला पकडून एका खोलीत डांबून ठेऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तहसील कार्यालयात दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी डांबून ठेवलेल्या मधुकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी आशा यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. आंबाजोगाई येथील स्वराती रूग्णालयात सध्या आशा यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. 


आशा वाघ आणि भाऊ मधुकर वाघ यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. याच वादातून त्यांच्यावर आज सकाळी मधूकर याने हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.